रोखठोक

काळाबाजारींवर पोलिसांचा आसूड, पण प्रशासनाचे हात बांधले कुणी ?

रोखठोक
सलाउद्दीन लोहार / शहादा

नंदुरबारचे पोलिस दल सध्‍या धडाकेबाज कारवायांमुळे फुल टू जोमात काम करीत असल्‍याचे चित्र सगळ्‍यांसमोर आले आहे. मात्र, त्‍याचवेळी युद्धाच्‍या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्‍या परिस्‍थितीमध्‍ये जिल्‍हा प्रशासनाकडून जनतेला दिलासा देणार्‍या कोणत्‍याच घडामोडी घडत नसल्‍याने रडावे की आश्‍चर्य व्‍यक्‍त करावे असा प्रश्‍न लोकांप्रमाणेच ‘नंदुरबार पोस्‍ट’ला देखील पडला आहे.

गेल्या काही दिवसांत केलेल्या सलग आणि धडाकेबाज कारवायांमुळे जिल्हाभरात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचे कौतुक होत असून, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा अल्पावधीत उलगडा करत पोलिसांनी गुन्हेगारीवर प्रभावी लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः शहादा तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका महिलेच्या खून प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि या खून प्रकरणाचा छडा लावून आरोपींना अटक केली, ते पाहता त्‍यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
याचदरम्यान जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत एका टोळीचा पर्दाफाश करण्यात त्‍यांना यश आले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या अनेक दुचाकी जप्त केल्‍याने ज्‍यांच्‍या दुचाकी चोरीला गेल्‍या होत्‍या, त्‍यांनाही आपल्‍या बाजूने लढणारे कुणीतरी लढणारे असल्‍याचा विश्‍वास वाटू लागला आहे.
नवापूर एमआयडीसी परिसरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात बनावट तूप, रसायने व उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे उघड झाले असून, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
जिल्ह्यात बेकायदेशीर पद्धतीने गॅसवर चालविल्या जाणाऱ्या रिक्षांविरोधातही पोलिसांनी आरटीओच्‍या मदतीसाठी मोठी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत शंभररावर रिक्षांवर कारवाई करीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
एकंदरीतच गेल्या काही दिवसांत केलेल्या या सलग कारवायांमुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतत सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची ही तत्परता कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे. यासाठी नंदुरबार पोलिसांना सलाम करायलाच हवा.
प्रशासनाला रोखले कुणी
युद्धाच्‍या पार्श्वभूमीवर सध्‍या सर्वत्र घरगुती गॅसच्‍या तुटवड्याच्‍या अफवांचा बाजार वेगात आहे. अशा वेळी नंदुरबार जिल्‍हा प्रशासनाने जनतेला दिलासा देण्‍यासाठी नेमके काय केले, असा प्रश्‍न या निमित्ताने नक्‍कीच विचारावा वाटतो. नंदुरबार म्‍हणजे दुर्गम, आदिवासींचा जिल्‍हा. येथील जनता भोळी, कमी शिकलेली आहे. जगाएवढा स्‍मार्टनेस त्‍यांच्‍याकडे नसेलही कदाचित. प्रशासन दाखवेल त्‍याच दिशेने ही जनता धावते. पण सध्‍याच्‍या परिस्‍थितीत तिला धीर देण्‍याची गरज आहे. या जनतेच्‍या तोंडातील घास हिरावून अवैध धंदे करणारे घरगुती गॅसचा काळाबाजार करीत आहेत. अवैध रिफिलिंग सेंटर्स खुलेआम वाहने, हॉटेल चालकांना गॅस रिफिलिंग करून देत आहेत. वाहनांमध्‍ये उघडपणे घरगुती गॅस भरून दिला जात आहे. पण प्रशासन याकडे पाहायला तयार नसेल, तर त्‍यांचे डोळे आणि हात कुणी बांधले हा प्रश्‍न तर पडणारच ना. घरगुती गॅसच्‍या टाक्‍यांसाठी लोकांच्‍या गॅस एजन्‍सीसमोर रांगा लागत असताना चार–पाच दिवस प्रशासनाला ‘काळजी नको, गॅसची टंचाई नाही’, एवढे सांगायलाही वेळ मिळाला नाही, याहून आश्‍चर्याची बाब कोणती असू शकते? एकीकडे राज्‍यातील जवळपास प्रत्‍येक जिल्‍हाधिकारी संदेश पाठवून, व्‍हिडिओ जारी करून जनतेला दिलासा देत होते, त्‍याचवेळी नंदुरबारमध्‍ये मात्र असे काहीही घडले नाही, यावरून नेमका कोणता अर्थ काढावा. आता राज्‍य शासनाने घरगुती गॅस पुरवठ्यातील अडथळे टाळण्‍यासह संभाव्‍य टंचाईच्‍या स्‍थितीत समन्‍वय साधण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर समित्‍या स्‍थापण्‍याचा आदेश काढल्‍यानंतर नंदुरबार जिल्‍हा प्रशासनाकडून हालचाली केल्‍या जात आहेत. मात्र, याआधीच प्रशासनाकडून जिल्‍ह्यातील टंचाईसदृश परिस्‍थितीचा आढावा का घेतला गेला नाही, संबंधित यंत्रणांना काळाबाजार करणार्‍यांवर कारवाईचे आदेश का दिले गेले नाहीत, असा प्रश्‍न नक्‍कीच सार्‍यांनाच पडला आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांची नियुक्‍ती लोकांच्‍या सेवेसाठी, दिलासा देऊन त्‍यांचे जीवन सुखकर करण्‍यासाठी असते. पण नंदुरबारमध्‍ये हेच घडत नसेल तर ‘गतिमान प्रशासन, गतिशिल शासन’ असे म्‍हणावे तरी कोणत्‍या तोंडाने? आणि त्‍याबाबत जिल्‍हा प्रशासनाकडे उत्तर तरी काय आहे?

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button