नंदुरबारमधील आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांचा पंचनामा : सुविधांची पडताळणी सुरू, अधिकार्यांना विद्यार्थ्यांसोबत करावे लागणार जेवण

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सोयीसुविधांच्या ढासळत्या परिस्थितीबाबत तक्रारी वाढताच अखेर आदिवासी विकास विभागाने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांची तपासणी सुरू केली आहे. अधिकार्यांचे पथक आश्रमशाळा व वसतिगृहांना भेट देऊन तेथील भौतिक सुविधांचा पंचनामा करणार आहे. अर्थात, हा नियमित तपासणीचा भाग असला तरी यावेळी ही पाहणी खर्या अर्थाने या आश्रमशाळा व वसतिगृहांतील सुविधांचा दर्जा वाढविण्यास मदत करणार की नेहमीप्रमाणे हाही फार्स ठरणार, याकडे आदिवासी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा व वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी शिकणार्या व राहणार्या विद्यार्थ्यांना मिळणार्या सोयीसुविधांच्या बाबतीत नेहमीच ओरड सुरू असते. काही आश्रमशाळांत विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिले जाते, तर वसतिगृहांत निवास, पाणी, वीज व्यवस्थेचा पुरता बोर्या वाजलेला आहे. आश्रमशाळांत शिक्षक व इतर कर्मचार्यांची वाणवा असून, त्यामुळे तेथे शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी होत असल्याची ओरडही सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर २ मार्चला जिल्हा दौर्यावर असताना आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांतील भौतिक सोयीसुविधांचा आढावा घेतला होता. यावेळी काही कमतरता दिसून आल्यानंतर त्यांनी आश्रमशाळा व वसतिगृहांची तपासणी करून तेथे सुधारणा करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले होते. त्यानुसार आता नाशिक येथील आदिवासी अपर आयुक्त कार्यालयाचे पथक या आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील भौतिक सोयीसुविधांचा पंचनामा करणार आहेत.
या बाबींची होणार पडताळणी
या तपासणी मोहिमेत अधिकार्यांकडून आश्रमशाळांतील पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, आरोग्य सुविधा, निवास व्यवस्था, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती, शिक्षकांची उपलब्धता, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता व त्याचा दर्जा, मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षा, सीसीटीव्ही, स्वच्छतागृहे, स्नानगृहे यांची अवस्था या सगळ्या बाबींची कसून पाहणी केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या निकृष्ट जेवणाबाबत नेहमीच ओरड होते. आता अधिकार्यांचे पथक या मोहिमेत दोन दिवस शाळांत मुक्कामी राहून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण, त्याची गुणवत्ता, स्वयंपाकृहातील स्वच्छता, भोजनाचा दर्जा, व पोषणमूल्याची तपासणी करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही तपासणी करताना अधिकार्यांनी स्वत: या भोजन–नाश्त्याची चव चाखावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
फार्स ठरू नये हीच अपेक्षा
आदिवासी विकास विभागामार्फत तळोदा व नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या आश्रमशाळा व वसतिगृहांची होणारी तपासणीची मोहीम २६ मार्चपर्यंत चालणार आहे. आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांतील सोयीसुविधांबाबत ओरड सुरू होताच नेहमीच अशी तपासणी मोहीम आखली जाते. तपासणी झाल्यावर काहीअंशी तेथील सुविधांमध्ये वाढही केली जाते. पण थोड्याच दिवसांत परिस्थिती जैसे थे होऊ लागते, हे नेहमीचेच झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यावेळी तरी ही पाहणी व तपासणी मोहीम नेहमीसारखी फार्स ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



