गुन्हे वार्ता

नवापूर तालुक्‍यात खैर लाकूड तस्‍करीचा पर्दाफाश; वनविभागाची धडक कारवाई, अवैधरित्‍या तोडून ठेवलेले १२२ नग जप्‍त, संशयित तस्‍कर फरार

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यात वनसंपत्तीची कत्तल करून खुलेआम तस्‍करी सुरू असल्‍याचा आणखी एक धक्‍कादायक प्रकार समोर वनविभागाने केलेल्‍या कारवाईतून समोर आला आहे. वनविभागाच्‍या पथकाने नवापूर तालुक्‍यातील खळबर्डी परिसरातील वनक्षेत्रात छापा टाकून अवैधरित्‍या तोडून तस्‍करीसाठी ठेवलेला खैर लाकडाचा साठा जप्‍त केला असून, या कारवाईत तब्‍बल लाकडाचे १२२ नग वनविभागाच्‍या हाती लागले आहेत.
वनविभागाकडून देण्‍यात आलेल्‍या माहितीनुसार, नवापूर तालुक्‍याच्‍या मौजे खळबर्डी महसूल क्षेत्रात वनसंपत्तीच्‍या तस्‍करीसाठी काही लाकडांची कत्तल करून ठेवण्‍यात आल्‍याची माहिती नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक रोशन बुवा यांना खबर्‍याकडून मिळाली होती. यानुसार बुवा यांनी तातडीने पथकाला त्‍या ठिकाणी पाठवून पडताळणी केली. या पथकाने खबर मिळालेल्‍या ठिकाणी रविवारी (दि.१५) छापा टाकला असता तेथे खैर प्रजातीच्‍या झाडाच्‍या लाकडाचे १२२ तुकडे करून साठा करून ठेवल्‍याचे आढळले. वनविभागाच्‍या पथकाने हा साठा ताब्‍यात घेतला. मात्र, तोपर्यंत या झाडांची कत्तल करणारा संशयित फरार झाला होता. वनविभागाने जप्‍त केलेल्‍या खैर लाकडांची किंमत सध्‍याच्‍या बाजारभावानुसार सुमारे ६० हजार रुपये असल्‍याची माहिती देण्‍यात आली.
दरम्‍यान, या प्रकरणी वनपाल वडकळंबी यांनी प्रथम अहवाल नोंदवून वनविभागाच्‍या कायद्यानुसार गुन्‍ह्याची नोंद केली. धुळे वनवृत्ताच्‍या वनसंरक्षक नीनू सोमराज, नंदुरबारचे वनसंरक्षक संतोष सस्‍ते, विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर, सहायक वनसंरक्षक रोशन बुवा, नवापूरचे वनक्षेत्रपाल अमोल काशीकर, वनक्षेत्रपाल प्राशा पगार यांच्‍या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्‍या कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button