नंदुरबार जिल्हा

रिक्षातून जाताना ‘तो’ आडवा आला, फोटोसाठी मोबाईल काढताच शेतात पळाला; तळोदा तालुक्‍यात ‘त्‍याच्‍या’ दर्शनाने घबराट

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्‍यात मोड व मोहिदा शिवारात भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडू लागल्‍याने शेतकर्‍यांमध्‍ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका व्‍यक्‍तीला रिक्षातून जाताना समोरच बिबट्याने दर्शन दिले. विशेष म्‍हणजे फोटो काढण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यावर हा बिबट्या शेजारील उसाच्‍या शेतात जावून लपल्‍याने आता तो पुन्‍हा बाहेर येण्‍याच्‍या भीतीने या रस्‍त्‍यावरील वाहतूक कमी झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.
तळोदा तालुक्‍यातील मोड व मोहिदा शेतशिवारातील रस्‍त्‍यावर नेहमीच शेतकर्‍यांसह इतरांची वर्दळ असते. या भागात बिबट्याचा वावर असल्‍याची चर्चा गेल्‍या काही दिवसांपासून होती. दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्‍या सुमारास संजय थोरात हे आपली रिक्षा घेऊन मोहिदा ते मोड रस्‍त्‍याने निघाले होते. यावेळी अचानक एक बिबट्या त्‍यांच्‍या रिक्षासमोरून आडवा गेला. यामुळे त्‍यांची पाचावर धारण बसली. बिबट्याला पाहून थोरात यांनी खिशातून मोबाईल काढून त्‍याची छबी टिपण्‍याचा प्रयत्‍न केला. यावर बिबट्याने धुम ठोकत रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेल्‍या दीपक चौधरी यांच्‍या उसाच्‍या शेतात जावून लपला. थोरात यांनी हिंमत करून अखेर त्‍या बिबट्याची छबी आपल्‍या मोबाईलमध्‍ये टिपली.
दरम्‍यान, सध्‍या उसाचा तोडणीचा हंगाम आटोपल्‍याने बिबट्याच्‍या लपण्‍याची ठिकाणे कमी झाली असून, त्‍यामुळे रस्‍त्‍यांवरच त्‍याचा मुक्‍तसंचार वाढल्‍याचे सांगण्‍यात येते. मात्र, यामुळे परिसरातील नागरिकांमध्‍ये घबराट निर्माण झाली आहे. या परिसरातील शेतकरी व गावकर्‍यांनी घडलेल्‍या प्रकाराची माहिती वनविभागाला कळवली आहे. काही अनर्थ घडण्‍याच्‍या आत बिबट्या एकच आहे की जास्‍त याची माहिती काढून त्‍यांचा बंदोबस्‍त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button