नंदुरबार जिल्हा

धडगाव तालुक्‍यात पाणी पेटले : शिपाणीपाडावासीय संतापले, ‘युवा क्रांती’ म्‍हणाली, तीन दिवसात तोडगा काढा, अन्‍यथा…

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : धडगाव तालुक्‍यातील तेलखेडी येथील शिपाणीपाडा येथील भीषण पाणीटंचाईचा प्रश्‍न पेटला असून, या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाविरोधात संताप व्‍यक्‍त होत आहे. युवा क्रांती, नंदुरबार या संघटनेने आता हा प्रश्‍न उचलून धरीत प्रशासनाला टार्गेट केले असून, येत्‍या तीन दिवसांत शिपाणीपाडाकरांना पाणी उपलब्‍ध न करून दिल्‍यास थेट गटविकास अधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्‍याचा इशारा दिला आहे.
धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील शिपाणीपाडा येथे भीषण पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल सुरू झाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना डोंगरदऱ्यांतून तब्बल १ ते २ किलोमीटर पायपीट करावी लागत असून, गावातील नैसर्गिक पाणीस्रोत पूर्णपणे आटले आहेत. उन्हाच्या कडक झळा व गढूळ झऱ्याचे पाणी यामुळे महिलांना रात्रभर जागून पाणी भरण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर युवा क्रांती नंदूरबार संघटनेने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “हर घर नल” योजनेसारख्या योजना केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप करीत संघटनेने प्रशासनाकडे शिपाणीपाडा येथे तत्काळ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नवीन विंधन विहीर अथवा कूपनलिका मंजूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अतिदुर्गम भागातील महिलांना पाण्यासाठी रात्रभर जागून डोंगरदऱ्यांत फिरावे लागणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. तीन दिवसांत ठोस पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
निवेदन देताना प्रदेश संघटक मंगेश वळवी, तालुका प्रमुख लक्ष्मण पाडवी, तालुका संघटक रविंद्र वळवी यांच्यासह कमनीबाई पाडवी, ज्योती पाडवी, मंगला पाडवी, होमी पाडवी, सिमी पाडवी, पिढी पाडवी, वर्षा पाडवी, शरमिला पाडवी, शिमी पावरा, सविता पावरा, सला पावरा, मिना पावरा, पालू पावरा, सोनाली पावरा, गुलाब पाडवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button