विसरवाडी-नंदुरबार रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची दुचाकीला जबर धडक, दोन तरुण गंभीर जखमी
विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी सायंकाळी नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यावर घडली. अपघातातील दोन्ह तरुणांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या दुचाकीला धडक देऊन फरार झालेल्या कंटेनर चालकाचा शोध सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल अशोक चौधरी व आकाश जाधव हे दोन तरुण दुचाकी (एमएच ३९ एएम ०५९६) वरून नंदुरबारहून नवापूरकडे येत होते. दोघेही नवापूर एमआयडीसी येथे कामानिमित्त जात असताना सोमवारी (दि.१६) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वडदे गावाजवळ त्यांच्या दुचाकीला कंटेनर (क्र. जीजे ०५ सीवाय २०२७) ने धडक दिली. हा कंटेनर एका कंपनीचे वेफर्स घेऊन नंदुरबारकडे जात होता.
या अपघातात राहुल चौधरी याला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, आकाशच्या तोंडाला गंभीर मार लागून त्याची जीभ कापली गेली आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की त्यात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच मदतीला धावून आलेल्या स्थानिक नागरिकांनी दोन्ही जखमींना तातडीने नाणिजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका पाचारण केली. रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावे याने या दोघांनाही तातडीने विसरवाडीतील ग्रामीण रुग्णलयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही जखमींना प्रकृती चिंताजनक असल्याने तत्काळ खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे दोघांचेही प्राण वाचले असून, त्यांच्यावर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, अपघातानंतर कंटेनरचा चालक जखमींची मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येत असून, त्याचा शोध घेतला जात आहे.



