दुष्मनीचा कळस : चौघांनी शेतकर्याची चार लाखांची पपईची ६०० झाडेच कापून टाकली; शहादा तालुक्यातील धक्कादायक घटना

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्याच्या विसापूरनजीकच्या पिंपळोद शिवारात चार जणांनी विकृत दुष्मनीचा प्रत्यय देत एका शेतकर्याच्या शेतातील तब्बल ५०० ते ६०० पपईची झाडे कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये संबंधित शेतकर्याचे तब्बल ४ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, चारही संशयित आरोपींवर म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कध्या रायसिंग पवार (५५, रा. विरपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांची पिंपळोद शिवारात गट क्र. १० (१ व २) आणि ११ (१/२/३) मध्ये सामायिक शेती आहे. ६ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुकेश करमसिंग पवार, बुटासिंग वनकर पवार, राजेश करमसिंग पवार, सेवा कश्या पवार (सर्व रा. विसापूर, ता. शहादा) या चौघांनी या शेतात फौजदारी अतिक्रमण करून कध्या पवार यांच्या शेतात लावलेली पपईची झाडे लोखंडी धार्याने कापण्यास सुरूवात केली. कध्या पवार व इतरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता या चौघांनी कध्या पवार यांच्यासह इतरांना शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकीही दिली. काही क्षणांतच या चौघांनी या शेतातील तब्बल ५०० ते ६०० पपईची झाडे कापून टाकली.
या प्रकरणी कध्या रायसिंग पवार यांनी १६ मार्च रोजी दाखल केलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरोधात फौजदारीपात्र अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९ (३), ३२४ (४), ३५२, ३५१ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसावदचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल निलेश पाटील हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



