नंदुरबार जिल्हा

ट्रकचालकाच्‍या निष्‍काळजीपणाने घेतला तरुणाचा बळी; ट्रक मागे घेताना लक्षच दिले नाही अन्‌ विद्युत तारेला चिकटून गेला ‘त्‍या’ निष्‍पापाचा जीव; सारंगखेडानजीकची दुर्दैवी घटना

सारंगखेडा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : पपईने भरलेला ट्रक मागे घेताना चालकाने निष्‍काळजीपणा केल्‍याने मागे ठेवलेल्‍या पपईवर ताडपत्री टाकणार्‍या त्‍याच्‍याच सहकारी १९ वर्षीय तरुण सहकार्‍याचा विद्युत तारेला स्‍पर्श होऊन मृत्‍यू झाल्‍याची दुर्दैवी घटना सारंगखेडा पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीतील सावळदा गावाच्‍या शिवारात घडली. या प्रकरणी संबंधित ट्रक चालकावर सारंगखेडा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आकाश भिमसिंग कछावा (१९, रा. शंकरपूर, मक्‍सी रोड, उज्‍जैन, मध्‍यप्रदेश) असे या दुर्घटनेत दगावलेल्‍या तरुणाचे तर जितेंद्र प्रल्‍हाद कछावा (रा. शंकरपूर, मक्‍सी रोड, उज्‍जैन, मध्‍यप्रदेश) असे गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेल्‍या ट्रकचालकाचे नाव आहे. ९ मार्च रोजी घडलेल्‍या या प्रकरणात आकाशचे वडिल भिमसिंग धन्नाजी कछावा यांनी १६ मार्च रोजी फिर्याद दाखल केली आहे.
या फिर्यादीनुसार, जितेंद्र कछावा हा त्‍याच्‍या ताब्‍यातील ट्रक (क्र. एमपी ०९ एचएच १२५०) घेऊन सावळदा शिवारातील शेतांमधून पपई घेऊन जाण्‍यासाठी आला होता. ९ मार्च रोजी एका शेतातील पपई भरण्‍यासाठी त्‍याने त्‍या शेताच्‍या शेजारीच असलेल्‍या कच्‍च्‍या रस्‍त्‍यावर ट्रक उभा केला होता. ट्रकमध्‍ये पपई भरल्‍यानंतर निघण्‍याची तयारी सुरू असताना आकाश हा ट्रकमध्‍ये भरलेल्‍या पपईवर ताडपत्री झाकत होता. त्‍याचवेळी जितेंद्रने गाडी सुरू करून मागे घेण्‍यास सुरूवात केली. ट्रकशेजारी उभ्‍या असलेल्‍या इतर मजुरांनी त्‍याला आवाज देऊन आकाश मागे काम करीत असल्‍याचे सांगितले. मात्र, त्‍याने लक्ष न देता तसाच ट्रक मागे घेतला. या ट्रकच्‍या मागे वरून विद्युत तारा गेल्‍या होत्‍या. ट्रक मागे येताना आकाश त्‍या विद्युत तारांच्‍या संपर्कात आला आणि विजेचा जोरदार धक्‍का बसून खाली कोसळला. त्‍यातच त्‍याचा मृत्‍यू झाला.
आकाशच्‍या वडिलांनी सारंगखेडा येथे आल्‍यावर फिर्याद दाखल केली. आता सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक किरण बार्‍हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button