शेतकर्यांसाठी गुड न्यूज : ९०.३४ लाख जणांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी २ हजार रुपये; पुढील आठवड्याचा मुहुर्त

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्य सरकारने लक्षावधी शेतकर्यांना गुड न्यूज दिली आहे. राज्यातील तब्बल ९० लाख हजार शेतकर्यांच्या बँक खात्यात राज्य सरकार पुढील आठवड्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये जमा करणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून, या हप्त्यासाठी १ हजार ७७४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेतीचा वाढता खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान योजनेत प्रति शेतकरी दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यात राज्य शासन तेवढ्याच रकमेची भर घालते. यामुळे दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत सात हप्ते वितरीत झाले असून, आता आठवा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी दिला जाणार आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी वितरीत केला होता. त्यानंतर राज्य शासनानेही हालचाली करून नमो योजनेचा पुढील हप्ता वितरीत करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद उपलब्ध करून दिल्याची माहिती भरणे यांनी दिली. या हप्त्यासाठी १७७४ कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात १८२० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे भरणे म्हणाले.



