नवापूर तालुक्यातील मुलींना मिळाले कर्करोगापासून बचावाचे कवच; विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण सुरू

विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शंका-कुशंका आणि अफवांना मागे सारत नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरातील कुमारिका मुलींनी गर्भाशराच्या कर्करोगापासून बचावासाठी एचपीव्ही लस टोचून घेत आयुष्याच्या नव्या पर्वाचा आरंभ केला. एचपीव्ही लस ही महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असून, विसरवाडी परिसरातील मुलींनी हे महत्त्व जाणून घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथे १४ ते १५ वयोगटातील मुलींना देण्यात येणार्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनावणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी, बाह्यरुग्ण अधिकारी डॉ. राजपूत व डॉ. सुलोचना बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी ग्रामीण रुग्णालय, विसरवाडी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद वळवी यांनी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. एचपीव्ही लस महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव करणारी असून, मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने ही लस प्रभावी ठरत आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला डॉ. अजयराज कुवर व डॉ. अशोक दुबे उपस्थित होते. रुग्णालयातील परिचारिका सलविना वळवी, परिचारिका कविता जाधव, परिचारिका सीमा वळवी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी ग्रामीण रुग्णालय, विसरवाडी येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरातील मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत जागरूकता वाढणार असून, भविष्यात गंभीर आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ही लसीकरण मोहीम ८ मार्च ते ८ जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालय, विसरवाडी येथे दररोज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरणासाठी सुविधा उपलब्ध राहील. पात्र मुली व पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.



