नंदुरबार जिल्हा प्रशासनाची ‘दक्षता’ : गॅसचा काळाबाजार करणार्यांना चाप; ३० ठिकाणी छापे, सिलिंडर पुरवठा केला नियमित
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणार्यांना चाप लावतानाच पुरवठा सुरळित करण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या आदेशानुसार स्थापन दक्षता पथकांनी जिल्ह्याच्या सहाही तालुक्यांत ३० ठिकाणी छापे मारून घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळित करीत सामान्य जनतेला दिलासा दिला. दरम्यान, घरगुती गॅसच्या वितरणातील अडथळे दूर करून सामान्यांची अडवणूक न करण्याची समजही प्रशासनाने गॅस वितरक एजन्सींना दिल्याचे सांगण्यात आले.
युद्धामुळे घरगुती गॅसच्या सिलिंडर पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून, या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही मंडळी गॅसचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यातच हॉटेल्स, रेस्टॉरंटना व्यावसायिक गॅस सिलिंडर देणे बंद करण्यात आल्याने त्यांच्याकडून अवैधपणे घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात असल्याने खर्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारीही प्रशासनाला मिळाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दक्षता पथकांना कडक सूचना देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार जिल्ह्याच्या सहाही तालुक्यांत स्थापन दक्षता पथकांनी सोमवार व मंगळवार असे सलग दोन दिवस आपापल्या तालुक्यांत ३० ठिकाणी छापे मारतानाच गॅस वितरक एजन्सींनाही भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. या छाप्यांमध्ये काहीही अवैध सापडले नसले तरी या छाप्यांमुळे गॅसचा काळाबाजार करणार्यांच्या मनात धडकी भरण्यात मात्र नक्कीच मदत झाली आहे.
तळोद्यातील रांग संपली
तळोदा शहरातील गॅस एजन्सीपुढे गेल्या तीन-चार दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची रांग दिसून येत होती. दक्षता पथकाने तेथे भेट देत वितरणातील नेमकी अडचण जाणून घेतली. अनेक जण एकाच वेळी गॅस बुकिंग करीत असल्याने कंपनीचे सर्व्हर बंद पडून ही परिस्थिती निर्माण झाल्याची अडचण गॅस वितरकाने पथकाला सांगितली. पथकाने ती अडचण दूर केल्यावर एजन्सीसमोरील रांग कमी होण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले.
दोन दिवसांचा साठा राहणार उपलब्ध, जनतेला दिलासा
नंदुरबार जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचे ३ लाख २० हजार ६४७ ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी एचपीसीलचे ८, बीपीसीएलचे ३ तर आयओसीएलचे १५ असे एकूण २६ वितरक आहेत. या वितरकांकडून दिवसाकाठी ७ हजार १९३ सिलिंडरचे वितरण केले जाते. सध्या जिल्ह्यातील सर्व वितरकांकडे मिळून १० हजार ३६१ सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. मात्र, ग्राहकांची अडचण होऊ नये यासाठी वितरकांनी दोन दिवसांचा आगावू साठा करून ठेवावा, असे जिल्हा प्रशासनाने सर्व वितरकांना बजावले आहे.
…तर कारवाई होणार, इथे साधा संपर्क
जिल्हाधिकार्यांनी स्थापन केलेल्या दक्षता पथकांमध्ये तहसीलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, पुरवठा लिपिक, विक्री अधिकारी, संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. या पथकाकडून गॅस वितरकांच्या कामकाजावर लक्ष ठेवले जात आहे. वितरणात अनियमितता आढळल्यास वितरकांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे, गॅस वितरणातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केला असून, तक्रार नोंदवण्यासाठी ९७६९९१९२२१ हा व्हॉटसॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.



