नंदुरबार जिल्हा

तळोदा तालुक्‍यात बिबट्याची टोळी : एक मोड–मोहिदा शिवारात दिसला, दुसर्‍याने तळोदा शहरानजीकच बोकडाचा फडशा पाडला, परिसरात दहशत

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्‍यात बिबट्याच्‍या टोळीने दहशत माजवली असून, दोन दिवसांपूर्वी मोड–मोहिदा रस्‍त्‍यावर बिबट्याने दर्शन देऊन तीन दिवस उलटत नाही तोच आता तळोदा शहरालगतच्‍या वस्‍तीतच एका बिबट्याने धुडगुस घालत बकरीचा फडशा पाडला आहे. यामुळे शहरासह तालुक्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्यांच्‍या बंदोबस्‍ताची मागणी होत आहे.
तीन दिवसांपूर्वी मोड-मोहिदा रस्‍त्‍यावर रिक्षाचालक संजय थोरात यांनी रस्‍त्‍यावर आडवा येऊन नंतर उसाच्‍या शेतात लपलेल्‍या बिबट्याची छबी आपल्‍या मोबाईल कॅमेर्‍यात टिपली होती. त्‍यानंतर आता तळोदा शहराला लागून असलेल्‍या आमराई, धानकावडा वसाहत परिसरातही बिबट्याने धुगडूस घातला आहे. आमराई परिसरातील राजेश तुकाराम सूर्यवंशी यांच्‍या रखवालदाराचा बोकड बिबट्याने हल्‍ला करून मारून टाकल्‍याची घटना घडली आहे. रखवालदाराने आपल्‍या घरालगत मोकळ्‍या जागेवर शेळ्‍या, मेंढ्या, बोकड बांधून ठेवले होते. मध्‍यरात्री दोन वाजेच्‍या सुमारास बिबट्याने त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला. यावेळी एका बोकडावर झडप मारून बिबट्याने लचके तोडत त्‍याचा फडशा पाडला.
यावेळी इतर बोकडांनी आवाज केल्‍याने रखवालदार व इतरांना जाग आली. त्‍यांनी आरडाओरड केल्‍याने बिबट्या तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर वनविभागाचे कर्मचारी आशुतोष पावरा, अमर वसावे यांनी पंचनामा केला. यावेळी त्‍यांना परिसरात बिबट्याचे ठसे आढळल्‍याने हा हल्‍ला बिबट्यानेच केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.
दरम्‍यान, या घटनेवरून तळोदा शहर परिसर व तालुक्‍यात बिबट्यांच्‍या टोळीचा वावर असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले असून, त्‍यांच्‍याकडून पाळीव प्राण्‍यांवर हल्‍ले होत असल्‍याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button