नंदुरबार जिल्हा

अशी कशी आई अन्‌ आजी : नवजात स्री अर्भकाला रुग्‍णालयातच सोडून ठोकली धूम; नंदुरबारच्‍या जिल्‍हा रुग्‍णालयातील धक्‍कादायक प्रकार

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : प्रसुतीसाठी दाखल झालेल्‍या एका महिलेने प्रसुतीनंतर आपल्‍या दोन दिवसांच्‍या स्‍त्री जातीच्‍या अर्भकाला तेथेच सोडून आपल्‍या आईसोबत पळ काढल्‍याचा नंदुरबारच्‍या जिल्‍हा रुग्‍णालयात उघडकीस आला आहे. तब्‍बल दीड महिना शोध घेतल्‍यानंतर या दोघींचाही शोध न लागल्‍याने अखेर त्‍यांच्‍यावर नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नंदुरबारच्‍या जिल्‍हा रुग्‍णालयात अक्‍कलकुवा येथील एक ३२ वर्षीय महिला ५ फेब्रुवारी रोजी प्रसुतीसाठी दाखल झाली होती. डॉक्‍टरांनी तपासून तिला रुग्‍णालयात दाखल करून घेतल्‍यानंतर तिने स्री अर्भकाला जन्‍म दिला. मात्र, बाळाची प्रकृती खराब असल्‍याने बाळाला दुसर्‍या वॉर्डात काचेच्‍या पेटीत ठेवण्‍यात आले. दुसर्‍या दिवशी बाळ रडू लागल्‍यानंतर या महिलेने त्‍याला बाटलीने दुधही पाजले.
काही वेळाने बाळ पुन्‍हा रडू लागल्‍यानंतर रुग्‍णालयातील कर्मचारी बाळाला दुध पाजण्‍यासाठी त्‍या महिलेला बोलावण्‍यासाठी गेले. मात्र, ती महिला व तिच्‍यासोबत आलेली तिची आई जागेवर नव्‍हते. या दोघी आसपास गेल्‍या असतील असे समजून रुग्‍णालयाचे कर्मचारी परतले. मात्र, त्‍या दिवशी रात्री देखील असाच प्रकार घडला. रुग्‍णालयातील कर्मचार्‍यांनी त्‍या दोघींचा शोध घेतला असता त्‍या कुठेही आढळल्‍या नाहीत.
सलग काही दिवस त्‍या दोघी रुग्‍णालयात न दिसल्‍याने रुग्‍णालय प्रशासनाने त्‍या महिलेने प्रसुतीसाठी दाखल होताना दिलेल्‍या पत्त्‍यावर तिचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍या दोघी तेथेही सापडल्‍या नाहीत. अखेर तब्‍बल ४० दिवस वाट पाहिल्‍यानंतर रुग्‍णालय प्रशासनाच्‍या वतीने कर्मचारी दिशा नरेंद्र सैंदाणे यांनी नंदुरबार पोलिसांना याबाबत माहिती देऊन सदर महिला व तिच्‍या आईविरोधात रितसर फिर्याद नोंदवली. त्‍यावरून पोलिसांनी त्‍या दोघींवर गुन्‍हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button