वाळू आहे की सोने? : अमळथे घाटात दडलंय तरी काय; वाळूच्या मुलभूत किमतीपेक्षा तब्बल ९ पट अधिक बोली; जिल्हाभर रंगलीय चर्चा, इतरत्र काय झालं, वाचा…

शहादा (सलाऊद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावात यंदा अभूतपूर्व बोली लागल्याने संपूर्ण प्रक्रियेवर चर्चा रंगली आहे. विशेषतः अमळथे येथील वाळू घाटाला शासनाने ठरवलेल्या मूलभूत किमतीपेक्षा तब्बल नऊपट अधिक बोली लागल्याने “या घाटात दडलंय तरी काय?” असा सवाल उपस्थित होत आहे. इतरत्र देखील फारशी वेगळी परिस्थिती नसून, सात घाटांच्या लिलावातून शासनाला एकूण ६ कोटी ७२ लाख २७ हजार १५० रुपये महसूल मिळणार आहे.
जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर आठ वाळू घाटांचा लिलाव पार पडला. यात नंदुरबार तालुक्यातील आराळे, ओसर्ली, अमळथे, बोराळे आणि शहादा तालुक्यातील दोंदवाडे, ससदे, कवठळ व फेस या घाटांचा समावेश होता. ओसर्ली घाटाचा लिलाव तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आला, तर उर्वरित सात घाटांना अपेक्षेपेक्षा जास्त बोली मिळाली.
अमळथे, दोंदवाडे घाट ठरला चर्चेचा विषय
अमळथे, घाटातून ४ हजार ९६१ ब्रास वाळूचा अंदाज असून, शासनाने यासाठी २६.७८ लाख रुपये मूलभूत किंमत निश्चित केली होती. मात्र, प्रत्यक्ष लिलावात या घाटासाठी तब्बल २ कोटी ४८ लाख ३४ हजार ४४४ रुपयांची बोली लागली. म्हणजेच प्रति ब्रास वाळूची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा जास्त ठरली आहे. दोंदवाडे घाटासाठी शासनाने ४८.६५ लाखांची किंमत निश्चित केली होती. मात्र, येथेही तब्बल साडेतीन पटींच्या वाढीसह १ कोटी ६२ लाख ६७ हजार ७०८ रुपये इतकी बोली लागली.
अनियमिततेची शक्यता?
इतक्या मोठ्या बोलीमुळे भविष्यात वाळूचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ठेकेदारांनी खर्च वसूल करण्यासाठी अवैध वाळू उपसा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही वाळू लिलावात अनियमितता, हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन, तसेच बनावट पावत्या वापरण्याचे प्रकार समोर आले होते.
प्रशासनावर जबाबदारी
या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, वाळू उपशावर कडक नियंत्रण ठेवणे, पारदर्शकता राखणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे त्यांना अत्यंत आवश्यक ठरणार आहे. विशेषतः अमळथे घाटातील नऊपट बोलीमागील कारणांचा सखोल तपास करण्याची मागणी होऊ लागली आहे. एकूणच, या लिलावाने महसूल वाढला असला तरी पारदर्शकता आणि पर्यावरणीय नियमांचे पालन हे मोठे आव्हान ठरणार आहे.
इतर घाटांची स्थिती
आराळे : १२.२० लाख → १५.२७ लाख
बोराळे : ६१.५१ लाख → ६४.५४ लाख
ससदे : ४९.४५ लाख → ५१.३२ लाख
कवठळ : ७४.४१ लाख → ७८.५५ लाख
फेस : ४२.९३ लाख → ५१.५५ लाख



