शहादा तालुक्यात सामान्यांच्या जीवाशी खेळ : बेकायदेशीर कच्च्या पपई प्रक्रियेचा भंडाफोड; खुलेआम चालतोय उद्योग

शहादा (सलाऊद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मनरद, तिखोरा, उटावद आणि मलोणी परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे कच्च्या पपईवर प्रक्रिया करून त्याला पूर्णत्व दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा सामान्यांच्या जीवाशी खेळ सुरू असून, संबंधित विभाग याकडे दूर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणताही अधिकृत परवाना न घेता पपईवर प्रक्रिया केली जात असल्याची माहिती हाती लागली आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेमध्ये स्वच्छतेचा पूर्णतः अभाव आढळून आला आहे. दूषित पाणी, अस्वच्छ जागा आणि कोणतीही आरोग्यविषयक मानके न पाळता ही प्रक्रिया सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असूनही अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणा झोपेत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, दूषित पद्धतीने प्रक्रिया केलेला माल बाजारात पोहोचल्यास सर्वसामान्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.



