मार्केट पोस्ट

गुढीपाडवा २०२६ : घरात सुख-समृद्धी हवी, तर अशी उभारा गुढी!, ११ वाजेपर्यंत प्रत्‍येक क्षण शुभमुहुर्त

नंदुरबार / छत्रपती संभाजीनगर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आज गुढीपाडवा.. चैत्र महिन्याची सुरूवात… हिंदू धर्मानुसार, नव्या वर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्‍या गुढीपाडव्‍याचा प्रारंभ झाला असून, आज (दि. १९) पहाटे ६ वाजून ५३ मिनिटे ते सकाळी ११ वाजेपर्यंत कोणत्‍याही वेळेत परंपरागत पद्धतीने गुढी उभारून या चैतन्‍यमयी पर्वाचा प्रारंभ करावा, असा सल्‍ला छत्रपती संभाजीनगर येथील ज्‍योतिषाचार्य पंडित ऋषिकेश चौधरी यांनी दिला आहे.
चैत्र हा  मराठी महिन्यातला पहिला महिना. या महिन्‍याचा पहिला दिवस म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा. नव संवत्सराचा म्हणजे नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी दारोदारी गुढी उभारून या नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी गुढी उभारणे ही भारतीय संस्कृतीतील जुनी परंपरा आहे.
याबाबत ‘नंदुरबार पोस्‍ट’शी संवाद साधताना ज्‍योतिषाचार्य पं. ऋषिकेश चौधरी यांनी सांगितले की, गुढी किंवा ब्रह्म ध्वज ही आनंद, स्‍वागत आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो. विविध वस्तूंची खरेदी करण्याचा या मुहूर्तावर प्रघात आहे.
अशी उभारा गुढी
प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खावून घराच्‍या दारात/उंच गच्‍चीवर किंवा गॅलरीमध्‍ये गुढी उभारावी. बांबूपासून तयार केलेल्‍या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी परिधान करावी. त्‍याला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर पितळाचा तांब्‍या किंवा चांदी किंवा कास्‍याचे धातूचे भांडे/ तांब्‍या/ फुलपात्र लावून गुढी उभारावी. काठीला गंध, फुले, अक्षता लावून गुढीची पूजा करून निरंजन लावून उदबत्ती दाखवून दूध साखरेचा, पेढ्याचा नैवेद्य दाखवावा.
हा आहे मुहुर्त
सकाळी ६ वाजून ५३ मिनिटे ते ११ वाजेपर्यंत कोणताही क्षण.

(टीप : वरील सर्व बाबी ‘नंदुरबार पोस्‍ट’माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून ‘नंदुरबार पोस्‍ट’ कोणताही दावा करीत नाही.)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button