तळोदातील अधिकार्यांची मुजोरी, ग्राहक दिनीच ग्राहकांना केले ‘दीन’; कार्यक्रम ठेवून आलेच नाहीत, ग्राहक संघटना भडकल्या
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आधीच दोन दिवस उशीरा आयोजित करून त्यातही नियोजित दिवशी प्रत्यक्षात अनुपस्थित राहून प्रशासकीय अधिकार्यांनी ग्राहक राजा नसल्याचे सिद्ध केल्याचा प्रकार तळोदामध्ये उघडकीस आला आहे. ग्राहन दिनाच्या कार्यक्रमात शासकीय अधिकार्यांनी गैरहजेरी लावल्याने ग्राहक संघटना संतापल्या असून, संबंधित अधिकार्यांवर कडक कारवाईची मागणी या संघटनांच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. या निमित्ताने शासकीय अधिकारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ग्राहकांना येणार्या अडचणी समजूत घेत त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. यंदा सलग दोन दिवस सुटी आल्याने तळोदा येथे दोन दिवस उशीरा म्हणजे १७ मार्चला या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, हा कार्यक्रम नियोजनाचा अभाव, गोंधळ, संताप आणि नाट्यमय घडामोडींनीच अधिक गाजला.
१७ मार्चला अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि राज्यस्तरीय ग्राहक मंचचे पदाधिकारी अगदी वेळेत या कार्यक्रमासाठी पोहोचले. शासकीय अधिकारी मात्र तब्बल तासाभराने कार्यक्रमस्थळी आले. ग्राहकांच्या समस्या मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठीच्या या कार्यक्रमाबाबत शासकीय अधिकार्यांना आस्थाच नसेल तर असा कार्यक्रम घेण्याची औपचारिकता करायची कशाला, असा प्रश्न करीत ग्राहक पंचायतींच्या सदस्यांनी अधिकार्यांच्या मुजोरपणावर संताप व्यक्त केला.
कार्यक्रम सुरू झाल्यानंतरही अनेक विभागांचे अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमस्थळी आलेच नाहीत. यामध्ये सहायक निबंधक वर्ग-२, वजन मापे निरीक्षक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्यांचा समावेश होता. आता या अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. दरम्यान, तळोदा येथील पुरवठा निरीक्षक द्वारका आगळे यांनी या कार्यक्रमासाठी अनुपस्थित राहिलेल्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात अधिकार्यांचे उशीरा येणे, काही अधिकार्यांनी कार्यक्रमाकडे पाठच फिरविणे ही गंभीर बाब आहे. अनेक विभागांचे अधिकारीच उपस्थित नसल्याने अनेक ग्राहकांना त्यांच्या समस्या मांडताच आल्या नाहीत. प्रशासनाने गांभीर्याने या कार्यक्रमाचे आयोजन करायला हवे होते.
– प्रा. संजय शर्मा (जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत, महाराष्ट्र)
अधिकार्यांच्या गैरहजेरीने या महत्त्वाच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देशचा हरवला. अधिकारी अशी उदासिनता दाखवणार असतील तर ग्राहकांचे प्रश्न कधी सुटणार, हा प्रश्नच उरतो. प्रशासनातील अधिक़ार्यांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.
– भिका चव्हाण (तालुकाध्यक्ष तळोदा, अखिल भारतीय ग्राहक पंचायत)



