गुन्हे वार्ता

तळोदात पोलिसांनी उभारली मोठ्या कारवाईची गुढी; गुटखा, दारू तस्‍करीचा भंडाफोड; टीप मिळताच धाड टाकून आठ लाखांचा मुद्देमाल केला जप्‍त, एकाला बेड्या

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तळोदा पोलिसांनी गुरुवारी ऐन गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी मोठी कारवाई करीत दारू आणि प्रतिबंधित गुटख्‍याच्‍या तस्‍करीच्‍या भंडाफोडीची गुढी उभारली. शहरात दारू व गुटख्‍याची तस्‍करी सुरू असल्‍याची टीप मिळताच पोलिसांनी धाड टाकत एकाला रंगेहात पकडून तब्‍बल सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तळोदा शहरातील शहादा रोडवरील भन्‍साली प्‍लाझासमोर रस्‍त्‍यावर एक जण मोठ्या गाडीतून आरोग्‍यास हानिकारक अशा प्रतिबंधित गुटखा आणि दारूची तस्‍करी करीत असल्‍याची माहिती तळोदा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने पथकासह संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी तेथे नटवर दामजी वसावे (२९, रा. काकरपट्टी, ता. धडगाव, जि. नंदुरबार) हा एका बोलेरो जीपमधून प्रतिबंधित गुटखा व दारूचा साठा घेऊन जाताना पोलिसांच्‍या हाती लागला.
पोलिसांनी त्‍याच्‍याकडून देशीच्‍या ३०० बाटल्‍या भरलेले तीन बॉक्‍स, बिअरच्‍या ४८ बाटल्‍या भरलेले ४ बॉक्‍स, विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूचे वेगवेगळ्‍या रंगाचे पाऊच तसेच महिंद्रा बोलेरो वाहन असा एकूण ७ लाख ५८ हजार ५९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्‍त केला. नटवर वसावे याला ताब्‍यात घेण्‍यात आले असून, पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अकिलखा पठाण हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button