नवापूर पालिकेने वाढवला दिव्यांगांच्या पाडव्याचा गोडवा; १३० लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी ३४०० रुपये केले जमा

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर नगर पालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवलेला निधी त्यांच्या बँक खात्यात वितरीत करून त्यांचा पाडवा गोड केला. पालिकेने १३० लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार ४०० रुपये असे एकूण ४ लाख ४२ हजार रुपये जमा केले आहेत.
नवापूर नगरपालिकेने शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांना दिव्यांग कल्याण योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी करून १३० लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली होती. याच पात्र लाभार्थ्यांना आता प्रत्येकी ३ हजार ४०० रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
पाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरातील बिरसा मुंडा सभागृहात निधी वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिव्यांग बांधवांना नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुरय्याबी शहा, उपसभापती मनीषा बावची, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, आरोग्य सभापती मीनल लोहार, न.प. मुख्याधिकारी डॉ. मयुर पाटील आदींच्या हस्ते निधीचे धनादेश देण्यात आले. या प्रसंगी प्रकल्प अधिकारी प्रशांत भट यांनी नगर पालिकेतर्फे असलेल्या दिव्यांगांच्या योजनांची माहिती दिली. यावेळी नगर पालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



