ताजी बातमी : रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायऊतार; सुनेत्रा पवारांकडे सोपवला राजीनामा

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शेकडो महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेल्या नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांवरून अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायऊतार झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी शुक्रवारी (दि. २०) आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. दरम्यान, यानंतर चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
१५ ऑक्टोबर २०२४ रोजी चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आणि त्यात चाकणकर यांचे खरात याच्याशी जवळिकीच्या संबंधांची चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षातील बहुतेक नेत्यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी खरात आणि चाकणकर यांचे एकत्रित फोटो व्हायरल करून त्यांची अडचण अधिकच वाढवली होती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळीच चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत होते. हे वृत्त अखेर संध्याकाळी खरे ठरले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चाकणकर लगेच पुण्याला रवाना झाल्या होत्या. तेथे त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत राज्य महिला आरोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पत्र लिहून वैयक्तिक कारणासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यात म्हटले आहे.



