गुन्हे वार्ता

अक्‍कलकुवा पंचायत समितीत लाचखोरीचा भंडाफोड; कार्यालयातच अभियंत्‍याने स्‍वीकारली हजार रुपयांची लाच, ‘एसीबी’ने रंगेहात पकडून आवळल्‍या मुसक्‍या

अक्‍कलकुवा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबारच्‍या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अक्‍कलकुवा पंचायत समिती कार्यालयातच लाचेचा सापळा यशस्‍वी केला. घरकुल योजनेचा दुसरा हप्‍ता मंजुर करण्‍याच्‍या बदल्‍यात लाभार्थ्याकडून एक हजार रुपयांची लाच घेताना कंत्राटी अभियंता पंचायत समिती कार्यालयातच ‘एसीबी’च्‍या जाळ्‍यात अडकला. नरेश देविदास बोरसे अस या लाचखोर अभियंत्‍याचे नाव आहे.
‘एसीबी’ने दिलेल्‍या माहितीनुसार, तक्रारदाराच्‍या चुलत भावाला जामली, ता. अक्‍कलकुवा जि. नंदुरबार येथे घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाचा १५ हजार रुपयांचा पहिला हप्‍ताही त्‍यांना मिळाला होता. तर दुसर्‍या हप्‍त्‍याचे ७० हजार रुपये मंजूर व्‍हावेत, यासाठी त्‍यांचे प्रयत्‍न सुरू होते. हा हप्‍ता मंजूर होण्‍यासाठी जामली गावातील घरकुलाच्‍या बांधकामाचे फोटो काढून ते योजनेच्‍या संकेतस्‍थळावर अपलोड करणे आवश्‍यक होते. ही जबाबदारी अक्‍कलकुवा पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण विभागातील कंत्राटी अभियंता नरेश बोरसे याच्‍याकडे होती. त्‍यानुसार बोरसे याने १९ मार्चला जामली गावात जावून संबंधित घरकुलाच्‍या बांधकामाचे फोटो काढले.
मात्र, हे फोटो संकेतस्‍थळावर अपलोड करण्‍यासाठी बोरसेने तक्रारदाराच्‍या भावाकडे लाचेची मागणी केली. त्‍यांच्‍यात एक हजार रुपयांचा सौदा निश्‍चित झाल्‍यानंतर बोरसेने लाभार्थ्याला २० मार्चला पैसे घेऊन आपल्‍या कार्यालयात बोलावले. या दरम्‍यान लाभार्थ्याने आपल्‍या चुलत भावाच्‍या माध्‍यमातून ‘एसीबी’कडे तक्रार नोंदवली. त्‍यानंतर ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलिस हवालदार विजय ठाकरे, देवराम गावित, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, पोलिस नाईक हेमंतकुमार महाले या सहकार्‍यांच्‍या मदतीने बोरसेला रंगेहात पकडण्‍यासाठी अक्‍कलकुवा पंचायत समितीमध्‍ये सापळा रचला.
या ठिकाणी बोरसे याने घरकुलाचे कामकाज चालणार्‍या आपल्‍या कक्षातच तक्रारदाराच्‍या भावाला बोलावून घेत त्‍याच्‍याकडून लाचेची रक्‍कम स्‍वीकारली. याचवेळी ‘एसीबी’च्‍या पथकाने झडप घालून बोरसेला रंगेहात पडकले. त्‍याच्‍याविरोधात अक्‍कलकुवा पोलिस ठाण्‍यात लाचलुचपत प्रतिबंधक कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून, त्‍याच्‍या संपत्तीची चौकशी केली जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button