गुन्हे वार्ता

शहाद्यात ‘कांड’ करण्‍याचा डाव उधळला; गावठी पिस्‍तुलासह मध्‍यप्रदेशातून येणार्‍या दोघांना ‘एलसीबी’ने ठोकल्‍या बेड्या

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहरात घातपात करण्‍याचा मोठा डाव जिल्‍हा पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेशन शाखेने (एलसीबी) उधळून लावला आहे. एलसीबीच्‍या पथकाने मोठी कारवाई करीत मध्‍यप्रदेशातून गावठी पिस्‍तुल घेऊन येणार्‍या दोघांना ताब्‍यात घेतले असून, यात एका अल्‍पवयीन मुलाचा समावेश आहे. मुस्‍लिम बांधवांच्‍या ईदच्‍या पूर्वसंध्‍येलाच ही कारवाई झाल्‍याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मध्‍यप्रदेशातून दोघे जण गावठी पिस्‍तूल घेऊन शहाद्याकडे येत असल्‍याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्‍यानुसार पाटील यांनी सहकार्‍यांसह जावदा ते मंदाणा रस्‍त्‍यावर सापळा रचला. याच काळात मिळालेल्‍या वर्णनानुसार दिसणारे दोघे जण दुचाकीवरून (क्र. एमपी १० एमडब्‍ल्‍यू ५१८२) येताना या पथकाला दिसले. पोलिसांनी त्‍यांना अडवून चौकशी केल्‍यावर त्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्‍यांची झडती घेतल्‍यावर त्‍यांच्‍याकडे गावठी पिस्‍तूल सापडले.
या दोघांनाही ताब्‍यात घेऊन अटकेची कारवाई करण्‍यात आली. आता हे पिस्‍तुल नेमके कुणासाठी आणि कोणत्‍या उद्देशाने हे दोघे घेऊन येत होते. याची चौकशी सुरू आहे. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर अधीक्षक आशित कांबळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, हवालदार पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विकास कापुरे, शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button