आधी आगीने झोप उडवली अन् मग बिबट्याने जागवले; तळोद्यातील रांझणीकरांनी रात्रभर अनुभवला दुहेरी थरार
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्यातील रांझणी गावाच्या गावकर्यांनी गुरुवारी (दि. १८) दुहेरी थराराचा अनुभव घेतला. आधी गावालगतच्या एका शेतात लागलेली आग विझविण्यात गावकर्यांची दमछाक झाली तर नंतर तेथून परतताना भररस्त्यावर अंधारात बिबट्याचे दर्शन घडल्याने या गावकर्यांना भीतीपोटी रात्र जागून काढावी लागली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रांझणी गावालगत डॉ. योगेश विठोबा मराठे यांच्या शेताला लागून असलेल्या मुख्य विद्युत वाहिनीवर गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाले. याची ठिणगी डॉ. मराठे यांच्या शेतात पडून तेथील बांबूच्या झाडांना आग लागली. अवघ्या काही मिनिटांत या आगीने रौद्रावतार धारण केला. आगीची घटना कळताच सरपंच अजय ठाकरे, उपसरपंच शरद मराठे यांच्यासह गावकर्यांनी व विशेषत: युवकांनी तिकडे धाव घेत ती विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. आपले प्रयत्न तोकडे पडत असल्याचे लक्षात आल्यावर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी तासभर अथक परिश्रम करून ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.
यानंतर गावातील युवक गावाकडे परत निघाले. आगीच्या घटनास्थळापासून पुढे येत नाही तोच एका युवकाला रस्त्यापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर अंधारात हालचाल दिसून आली. या युवकाने हिंमत करून त्या दिशने मोबाईल टॉर्चच्या उजेडात पाहिले असता एक बिबट्या तेथे असल्याचे दिसून आले. यामुळे सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. यानंतर हिंमत करून युवक गावात परतले. मात्र, बिबट्या लपून बसल्याचे ठिकाण गावापासून जवळच असल्याने रात्रभर जागून या बिबट्याकडे लक्ष ठेवण्याची पाळी गावकर्यांवर आली. अधूनमधून बिबट्या गावाकडे येत होता. मात्र, टॉर्चचा उजेड मारताच परतत होता. हा खेळ पहाटे जवळपास तीन वाजेपर्यंत सुरू होता. या सगळ्या खेळात गावकर्यांना रात्र जागून काढावी लागली.
दरम्यान, रांझणी परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याचे सांगण्यात येत असून, या बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी परिसरात पिंजरे लावण्याची मागणी गावकर्यांकडून वनविभागाकडे केली जात आहे.



