धक्कादायक : नंदुरबार जिल्ह्यातील दोन अल्पवयीन तरुणींचे अपहरण; एकीला शहाद्यातून, तर दुसरीला नंदुरबार तालुक्यातून पळवले
शहादा / नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात दोन अल्पवयीन तरुणींचे अपहरण करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका मुलीला शहादा शहरातून तर दुसरीला नंदुरबार तालुक्यातील एका गावातून फुस लावून पळवून नेण्यात आले असून, दोन्ही प्रकरणात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहादा पोलिस ठाण्यात २० मार्च रोजी दाखल गुह्यानुसार शहादा शहरातील एका भागातून मजुराच्या १६ वर्षे ७ महिने २० दिवस वय असलेल्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले. शुक्रवारी (दि. २०) सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान सदर मजुराच्या घराबाहेरील शौचालयाच्या ठिकाणावरून या मुलीचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा दुसरा गुन्हा नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. या मुलीच्या अपहरणाची घटना १० मार्च रोजी रात्री १० ते ११ मार्चच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. ही नंदुरबार तालुक्याच्या एका गावातील मजुराची मुलगी असून, तिचे वय १७ आहे. गावात लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेल्यानंतर सदरील मुलगी तेथूनच तिला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचे तिच्या वडिलांनी २० मार्चला नंदुरबार तालुका पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल काशिनाथ साळवे पुढील तपास करीत आहेत.



