शहाद्यात सापडला ऐतिहासिक ठेवा : मारुती मंदिरासाठी खोदकाम करताना सापडली श्री गणेशाची प्राचीन मूर्ती, दर्शनासाठी गर्दी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करताना खोदकाम सुरू असताना प्राचीन गणेशमूर्ती सापडली आहे. यानंतर या मूर्तीच्या दर्शनासाठी या ठिकाणी दर्शनासाठी शहादा व परिसरातील भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खोलगल्ली परिसरारीतल मारुती मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे. यासाठी खोदकाम सुरू असतानाच या ठिकाणी अत्यंत प्राचीन अशी श्री गणरायाची मूर्ती सापडली. अवघ्या काही मिनिटांतच ही बातमी वार्यासारखी शहादा शहर व परिसरात पसरली. यानंतर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी श्री गणेशाची मूतीं सापडणे हा भाविक दैवी संकेत मानत आहेत.
दरम्यान, खोदकामाता सापडलेल्या श्री गणेश मूर्तीची रचना व स्वरूप पाहता ती अनेक वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जात आहे. सदरील प्राचीन मूर्ती सापडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने या संदर्भातील माहिती प्रशासनाला देतानाच मूर्तीचा कालावधी, ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच अन्य बाबींचा अभ्यास करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, खोदकामात प्राचीन मूर्ती सापडल्यानंतर या ठिकाणी व परिसरात प्राचीन व ऐतिहासिक ठेवा सापडण्याची शक्यता वर्तविली जात असून, या भागाला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्राप्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.



