आजीचा राग आला, नातवाने तिच्या डोक्यात थेट लोखंडी हत्याराने वार केला; तळोदाच्या खरवडमधील खतरनाक घटना
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्यातील खरवड गावात नातवानेच आजीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची खतरनाक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आजीच्या तक्रारीवरून तिच्या नातवाविरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उषाबाई रमेश ठाकरे (५३, रा. खरवड, ता. तळोदा, जि. नंदुरबार) हिचा १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिचा नातू किसन रमेश पाडवी याच्याशी काही कारणावरून वाद झाला होता. यावेळी उषाबाईने घराच्या अंगणात टाईमपास करणार्या किसनला ‘तुझ्या बापाने गोट्या खेळण्यास आणून दिल्या आहेत का’ अशी विचारणा केली.
याचा राग येवून किसनने लगेच आजी उषाबाईला शिविगाळ आणि मारहाण सुरू केली. यावेळी त्याने लोखंडी कोड्याने उषाबाईला डोक्यावर आणि कपाळावर प्रहार केला. यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर उषाबाई ठाकरे यांनी २० मार्चला तळोदा पोलिस ठाणे गाठून नातू किसन पाडवी याच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक भिमसिंग ठाकरे करीत आहेत.



