नंदुरबार जिल्हा

नवापूर तालुक्‍यात भीषण अपघात : पानबारा शिवारात दोन दुचाकींची धडक, दहिवेलला बहिणीकडे चाललेल्‍या युवकाचा करुण अंत, तीन जण गंभीर जखमी

विसरवाडी (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका तरुणाचा जागीच मृत्‍यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्‍याची भीषण दुर्घटना नवापूर तालुक्‍यात पानबारा शिवारात घडली. या अपघातात दगावलेला तरुण सुरतहून दहिवेलकडे सहकार्‍यासह दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सुरत येथील जयेश धनराज पाटील आणि विजय गंगाराम पाटील (दोघेही रा. निलगिरी, उधना, सुरत) हे दोघे तरुण दुचाकीवरून धुळे–सुरत राष्‍ट्रीय महामार्ग ५३ वरून दहिवेलकडे जयेशच्‍या बहिणीकडे चालले होते. पानबारा शिवारात पोहोचल्‍यानंतर महामार्गावरील रघुनाथ पेट्रोल पंपासमोर त्‍यांची दुचाकी समोरून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीवर आदळली. या अपघाताची तीव्रता इतकी होती की धडकेनंतर दोन्‍ही दुचाकीवरील चौघेही रस्‍त्‍यावर फेकले गेले. यात जयेश याच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर सर्वच जखमींना रुग्‍णालयात हलविण्‍यात येत असताना रस्‍त्‍यातच जयेश याचा मृत्‍यू झाला.
या अपघातात सुरत येथील विजय पाटील आणि जामनापाडा येथील हिरालाल पाचर्‍या गावित व दिनेश माखता देसाई असे तिघे जण जखमी झाले आहेत. यापैकी गावित व देसाई यांची प्रकृती चिंताजनक असून, त्‍यांना विसरवाडी येथील रुग्‍णालयात प्राथमिक उपचारानंतर नंदुरबार येथे हलविण्‍यात आले आहे.
दरम्‍यान, अपघाताची माहिती मिळताच स्‍थानिक नागरिक आणि जामनापाडा येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर गावित यांनी घटनास्‍थळी धाव घेत जखमींना रुग्‍णालयात हलविण्‍यासाठी मदत केली. तसेच विसरवाडी पोलिसांनी घटनास्‍थळाचा पंचनामा केला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button