नंदुरबार जिल्हा

तळोदा तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पपईचे पिक शेतातच आडवे, भरपाईची अपेक्षा

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्याला गुरुवारी (दि. १९) रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. या वादळी वार्‍याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे विशेषतः फळपिकांना मोठा फटका बसला असून, विशेषत: अनेक शेतकर्‍यांचे पपईचे पिक शेतातच आडवे झाले. आता नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांकडून शासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.
चिनोदा परिसरातील शेतकरी राजेंद्र दशरथ पाटील यांच्या आमलाड शिवारातील सुमारे चार एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या पपई पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या शेतात एकूण सुमारे चार हजार पपईची झाडे होती. मात्र, वादळी वाऱ्याच्या जोरदार तडाख्यामुळे अंदाजे ८०० ते ९०० झाडे अर्ध्यावरून तुटून पडली.
राजेंद्र पाटील यांनी मोठ्या मेहनतीने पपईची लागवड करीत लहान मुलाप्रमाणे संगोपन करीत पिक वाढवले होते. सध्या फळधारणा सुरू होऊन उत्पन्न मिळण्याची वेळ जवळ आली असताना, अचानक आलेल्या या आपत्तीने त्‍यांच्‍या आशेवर पाणी फेरले आहे. या नुकसानीमुळे त्‍यांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, तालुक्यातील इतर भागांमध्येही वादळी वाऱ्याचा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित महसूल व कृषी विभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

वादळी वार्‍याने माझ्या शेतातील पपईचे पिक उद्ध्‍वस्‍त झाले. यात सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून भरपाई द्यावी, एवढीच अपेक्षा आहे.
‍- राजेंद्र पाटील (नुकसानग्रस्‍त शेतकरी)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button