गुन्हे वार्ता

विकृतीचा कळस : शहादा तालुक्‍यात माथेफिरूने शेतातील केळीची शेकडो झाडे कापली; १० शेतकर्‍यांचे लक्षावधींचे नुकसान

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : एकीकडे अवकाळी पाऊस आणि वादळी वार्‍याने फळ पिकांचे नुकसान झालेले असतानाच आता शहादा तालुक्‍यात एका माथेफिरुच्‍या विकृतीचा फटका काही शेतकर्‍यांना सहन करावा लागला आहे. गोदीपूर शिवारात माथेफिरूने किळसवाणे कृत्‍य करीत चक्‍क दहा शेतकर्‍यांच्‍या शेतातील केळीची शेकडो झाडे कापून टाकीत त्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहादा पोलिस ठाण्‍यात तक्रारही दाखल करण्‍यात आली आहे.
आधीच गेल्‍या २२ दिवसांपासून सुरू असलेल्‍या युद्धामुळे निर्यात थंडावल्‍याने दरात मोठी घसरण होऊन केळी उत्‍पादकांना त्‍याचा फटका सहन करावा लागत आहे. त्‍यातच गेल्‍या तीन चार दिवसांत झालेल्‍या अवकाळी पाऊस आणि वादळी वार्‍याने काही ठिकाणी केळीसह अनेक फळ पिकांच्‍या बागा उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍या. हे दुहेरी संकट ओढवलेले असतानाच आता शहादा तालुक्‍यातील गोदीपूर शिवारात विकृत माथेफिरूने १० शेतकर्‍यांच्‍या शेतातील केळीची झाडेच तोडून टाकल्‍याने या शेतकर्‍यांवर रडण्‍याची पाळी आली आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शहादा तालुक्‍यातील ब्राह्मणपुरी येथील रोहिदास मंगेश पाटील, रवींद्र नामदेव कापडे, अशोक रघुनाथ पाटील, इश्‍वर रघुनाथ पाटील, दीपक श्रावण कापडे, छोटुलाल खंडू कापडे, कांतीलाल भगवान पाटील, किशोर भगवान पाटील, जगन्नाथ नारायण पाटील, पंकज नरसई पाटील यांची गोदीपूर शिवारात शेती आहे. या सर्वांच्‍या शेतातील सुमारे एक ते दीड हजार केळीची झाडे अज्ञात माथेफिरूंनी रात्रीच्‍या अंधारात कापून टाकली. ऐन काढणीला आलेली केळीची झाडे कापल्‍यामुळे या शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माथेफिरूने एवढ्यावरच न थांबता या शेतांतील पाण्‍याचे पाईप, ठिबकचे देखील नुकसान केले.
नुकसानभरपाईचे काय?
नैसर्गिक आपत्तीत शेतीपिकांचे नुकसान झाल्‍यास शेतकर्‍यांना त्‍या बदल्‍यात शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, अज्ञात माथेफिरूंनी असे नुकसान केल्‍यास शेतकर्‍यांना भरपाई दिली जात नाही. आता गोदीपूर शिवारात असाच प्रकार घडल्‍याने या शेतकर्‍यांना भरपाई मिळणार नसल्‍याचीही भीती वाटत असून, अज्ञातांनी केलेल्‍या नुकसानीचा देखील पिकविम्‍यात समावशे करावी, अशी मागणी या शेतकर्‍यांकडून होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button