अशोक खरातची बायको म्हणाली, माझ्या नवर्याला फसवलंय, जवळच्यांनीच पाठीत खंजीर खुपसला

मुंबई / नाशिक (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गजाआड करण्यात आलेला भोंदूबाबा कॅप्टन उर्फ अशोक खरात याचे नवनवीन कारनामे समोर येत असताना त्याच्या पत्नीने मात्र आपल्या पतीची बाजू घेतली आहे. माझ्या पतीला फसवून या प्रकरणात अडकवण्यात आले असून असे सांगत खरातच्या पत्नीने जवळच्यांनीच पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे.
अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे शंभरहून अधिक़ व्हिडिओ असल्याची चर्चा आहे. पोलिस या अनुषंगाने सर्व दृष्टीकोनातून तपास करीत असताना याच दरम्यान ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्राशी बोलताना खरातची पत्नी कल्पना हिने अशोक खरात निर्दोष असल्याचा दावा केला. ‘माझे पती मोठे व्यावसायिक किंवा तज्ज्ञ ज्योतिषी नाहीत. काही जवळच्या सहकार्यांनी त्यांची प्रतिमा उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.’, असे कल्पना खरातने सांगितले. आपल्या पतीला फसवले जात असल्याचा दावाही कल्पना खरातने केला.
दरम्यान, अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबियांपैकी कल्पना वगळता अन्य कुणीही त्याच्या अटकेवर किंवा त्याच्यावर होणार्या आरोपावर अद्याप भाष्य केलेले नाही. एवढेच नव्हे तर अशोक खरात याच्या जवळच्या लोकांनीही या विषयावर बोलणे टाळले आहे.



