नंदुरबार जिल्हा

नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांचा शहाद्यातील गाळेधारकांना दिलासा; म्‍हणाले, सुविधाविषयक समस्‍यांचे निराकरण करू

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नगर पालिकेच्‍या मालकीच्‍या ट्रक टर्मिनलमधील गाळेधारकांना भेडसावत असलेल्‍या समस्‍यांचे लवकरच निराकरण करू, असे आश्‍वासन शहादाचे लोकनियुक्‍त नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांनी दिले. या ठिकाणी असलेल्‍या गाळेधारकांनी करार नोंदणी, लोखंडी जिने, मुलभूत सुविधा आदी मुद्यांवर पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी त्‍यांनी आस्‍थेने सर्व प्रश्‍न समजूत घेत ते सोडविण्‍याची ग्‍वाही दिली.
डिसेंबर २०२१ मध्‍ये झालेल्‍या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन अनेकांनी ट्रक टर्मिनलमधील गाळे ३० वर्षांसाठी आरक्षित केले होते. त्‍यावेळी लिलावाची रक्‍कमही नगर परिषदेकडे भरण्‍यात आली. मात्र, अद्याप या गाळ्‍यांच्‍या नियमित नोंदणीचे करार पूर्ण करण्‍यात आलेले नाहीत. येथे जिन्‍यांचे काम अपूर्ण आहे. कचरा साठलेला आहे. पिण्‍याचे पाणी, स्‍वच्‍छता यांचाही अभाव आहे. लिलावाच्‍या वेळी जिन्‍याचे काम पूर्ण करून देण्‍याचे आश्‍वासन न.प.ने. दिले होते. यासंदर्भात न.प. मुख्‍याधिकार्‍यांशी वारंवार संपर्क साधण्‍यात आला. पण अद्याप त्‍यावर कार्यवाही करण्‍यात आलेली नाही, अशी तक्रार गाळेधारक व्‍यापार्‍यांनी निवेदनाद्वारे नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांच्‍याकडे केली.
गाळ्‍यांचे नियमित नोंदणीकृत करार केलेले नसले तरी त्‍यांचा वापर सुरू आहे. अशातच कोणत्‍याही सुविधा पुरविल्‍या जात नसल्‍या तरी न.प. कडून वार्षिक भाडे व कराच्‍या मागणीसाठी गाळेधारकांना नोटीस बजावली जात आहे, अशी तक्रार करीत गाळेधारकांनी तातडीने करार पूर्ण करावेत अन्‍यथा लिलावासाठी भरलेली रक्‍कम व्‍याजासह परत करावी, अशी मागणीही निवेदनात केली. या निवेदनावर विश्‍वनाथ पाटील, ॲड. सरजू चव्‍हाण, प्रवीण सैंदाणे, नगीन पाटील, कैलास पाटील, नीलेश चौधरी, भूषण निकम, नितीन पटेल, मनोज खेडकर आदींच्‍या स्‍वाक्षर्‍या आहेत.
यावर नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांनी या सर्व समस्‍यांचा आढावा घेत लवकरच त्‍यांचे निराकरण करण्‍याचे आश्‍वासन गाळेधारक व्‍यापार्‍यांच्‍या शिष्‍टमंडळाला दिले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button