शहाद्यात अवैध वाळू– मुरूम वाहतुकीला चाप; महसूलची धडक कारवाई, गुजरात पासिंगचा ट्रक जप्त

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात अवैध गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि त्याच्या आंतरराज्यीय वाहतुकीला चाप लावण्यासाठी अखेर महसूल प्रशासन कामाला लागले आहे. महसूल विभागाने शनिवारी (दि. २१) सकाळीच धडक कारवाई करीत मुरूमाची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक थेट जप्त केला. या कारवाईमुळे गौणखनिजांचा अवैध व्यवसाय करणार्या टोळीमध्ये खळबळ माजली असून, त्याचवेळी या कारवाईत महसूल विभागाकडून सातत्य राखण्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
सध्या उन्हाळा सुरू असल्याने शहादा शहरासह गाव-पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. प्रशासनाला अंधारात ठेवून या बांधकामांसाठी लागणारी रेती (वाळू) व मुरूमसारख्या गौण खनिजांचे अवैधरित्या उत्खनन करुन विनापरवाना वाहतूक केली जात आहे. मुरूम उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांना महसूल विभागाने मर्यादा घालून दिली असली तरी हे ओव्हरलोड वाहने भरलेले हे वाहनधारक बेदरकारपणे रस्त्याने धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात अनेक महिन्यांपासून विविध संघटनांसह सामान्य नागरिकांकडून महसूलसह पोलिसांकडे तक्रारी वाढल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने महसूल व पोलिस विभागाबाबत नाराजी व्यक्त होत होती. अखेर गौणखनिजांच्या या अवैध उत्खनन व वाहतूक करणार्यांवर कारवाईसाठी महसूल विभागाला शनिवारी मुहुर्त सापडला. महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळीच धडक कारवाई करीत अवैधरित्या मुरूमाची वाहतूक करणारा ट्रक (जीजे १९ वाय ८१९६) जप्त केला. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात मुरूम आढळून आला. संबंधित ट्रक पुढील चौकशीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे.
कारवाईत सातत्याची अपेक्षा
दरम्यान, या कारवाईमुळे सामान्यांमध्ये चांगली प्रतिक्रिया उमटत असली तरी महसूल विभागाने या कारवाईत सातत्य राखले तरच गौणखनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक याला लगाम बसेल, असे बोलले जात आहे. महसूल विभागाकडून कारवाई केल्यानंतर संबंधित वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा किती अधिक गौणखनिज भरले आहे, वाहतुकीचे नियम पाळले जातात की नाही, याची सातत्याने तपासणी होत रहावी, अशी अपेक्षा सामान्यांकडून व्यक्त होत आहे.



