स्टिअरिंगचा रॉड तुटला, ‘बोलेरो’ रस्त्यावरच उलटली; दैव बलवत्तर म्हणून बचावला ८ मजुरांचा जीव; नवापूर तालुक्यात अपघाताचा थरार
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गुजरातकडे निघालेल्या मजुरांना शनिवारी तालुक्यातील पानबरा सरई पुलाजवळ मोठ्या अपघाताचा थरार अनुभवायला मिळाला. ७ ते ८ मजूर भरलेले बोलेरो वाहन भरधाव वेगात असतानाच स्टिअरिंगचा रॉड तुटल्याने हे जागेवरच उलटले आणि वाहनाने रस्त्यावरच पलटी घेतली. अपघाताची तीव्रता अधिक असली तरी केवळ दैव बलवत्तर असल्यानेच वाहनातील सर्वांचा जीव बचावला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथून मजुरांना घेऊन बोलेरो गाडी (क्र. एमएच ०६ बीई ३६४०) गुजरात राज्यातील बडोदा येथे जात होती. कोंडाईबारी घाटातून प्रवास करताना पानबारा गावानजीक पुलाजवळ अचानक गाडीचा स्टिअरिंग रॉड तुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावरच उलटली. यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र, वाहनचालकाने प्रसंगावधान राखून गाडीतील कुणालाही मोठी दुखापत होणार नाही, याची काळजी घेत तशा पद्धतीने वाहन थांबविण्यात यश मिळविले.
अपघाताची माहिती मिळताच पानबारातील गावकऱ्यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. गाडीखाली दबल्या गेलेल्या मजुरांना गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले. तत्काळ १०३३ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. या अपघातात ७ ते ८ मजूर किरकोळ जखमी झाले असून, त्या सर्वांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.



