नंदुरबारच्या उमापती मंदिराचा होणार कायापालट; आ. चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, अतिक्रमण नियमानुकूल होताच विकासकामे करू

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन उमापती महादेव मंदिर परिसरातील साडेचार एकर शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे या जागेचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मिळाले आहेत, असे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
दरम्यान, या यशाबद्दल रविवारी मंदिर ट्रस्टच्या वतीने आ. रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला. जागा नियमानुकुल होताच या ठिकाणी भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन विकास कामे केली जातील, असे आ.रघुवंशी यांनी या सत्काराच्या वेळी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात मुंबई येथे महसूल मंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात विशेष बैठक पार पडली. यावेळी आ. रघुवंशी यांनी उमापती महादेव मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. “हे मंदिर शेकडो वर्षांपासून नंदुरबारकरांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिना व दसऱ्याच्या सीमोल्लंघनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिराच्या ताब्यातील ४.५ एकर जागा शासकीय असल्याने तिथे विकासकामे करण्यास अडचणी येत आहेत. ही जागा मंदिराच्या नावे नियमानुकूल करणे आवश्यक आहे,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्याला महसूलमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले.
मंदिराची जागा अधिकृतरीत्या नियमानुकूल झाल्यानंतर या ठिकाणी भाविकांसाठी भव्य भक्तनिवास, पिण्याचे पाणी आणि इतर सोयी-सुविधा निर्माण केल्या जातील. जागेच्या तांत्रिक अडचणीमुळे रखडलेला मंदिराचा कायापालट लवकरच सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ट्रस्टकडून आ. रघुवंशींचा सत्कार
शासकीय स्तरावर या विषयाचा यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल रविवारी उमापती महादेव मंदिर ट्रस्ट आणि भक्तांच्या वतीने आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
“शहरातील १०० वर्षे प्राचीन उमापती महादेव मंदिराचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. जागा नियमानुकूल होताच या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जातील.”
– आ. चंद्रकांत रघुवंशी (शिवसेना संपर्कप्रमुख)



