चोरट्यांनी देवीलाही सोडले नाही : नंदुरबारच्या वाघेश्वरी देवी मंदिरात चोरी, देवीच्या मुकुटासह दागिने ४० हजारांचे दागिने लंपास
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात चोरट्यांची हिंमत वाढतच चालली असून, आता चोरट्यांनी थेट हिंदू समाजाची देवालयेच टार्गेट करणे सुरू केले आहे. चोरट्यांनी शुक्रवारी रात्री नंदुरबारच्या वाघेश्वरी टेकडी येथील वाघेश्वरी मंदिरातील दागिन्यांवरच डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरा लगतच वाघेश्वरी टेकडीवर श्री वाघेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवीची स्वयंभू मूर्ती आणि नंदुरबार शहर व परिसरातील हजारो हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते.
अशी झाली चोरी
शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे मंदिर बंद होते. याच संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून वाघेश्वारी देवीच्या अंगावरील दागिने तसेच दानपेटीला लक्ष्य केले. यावेळी चोरट्यांनी देवीच्या डोक्यावरील मुकुट, कानातले, छोट्या मूर्तीच्या डोक्यावरील मुकुट तसेच दानपेटीतील १२०० रुपये रोख असा ऐवज चोरून नेला.
पहाटे मंदिराचे कर्मचारी नेहमीप्रमाणे मंदिरात आल्यानंतर त्यांच्या नजरेस हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर मयुर राजेंद्र मराठे (रा. जुनी भोईगल्ली, सिद्धीविनायक मंदिराजवळ मंगळाबाजार, नंदुरबार) यांनी तातडीने नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला.



