गुन्हे वार्ता

बंद हातपंपाच्‍या दुरूस्‍तीवरून अक्‍कलकुवा तालुक्‍यात जोरदार राडा; हाणामारी, गाडीवर दगडांचा मारा, २३ जणांवर गुन्‍हा

अक्‍कलकुवा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्‍या पण सध्‍या बंद अवस्‍थेत असलेल्‍या हातपंपाच्‍या दुरूस्‍तीवररून अक्‍कलकुवा तालुक्‍यातील काकडीआंबा पोस्‍ट ताळंबा येथे शुक्रवारी संध्‍याकाळी उशीरा जोरदार राडा झाला. दोन गटांत वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि दोन्‍ही गटांकडून परस्‍परांवर लाठ्याकाठ्या, दगड-विटांनी मारा झाला. या घटनेत परस्‍परविरोधी तक्रारीवरून तब्‍बल २३ जणांवर विविध कलमान्‍वये अक्‍कलकुवा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पहिली फिर्याद निर्मला दामजी पाडवी (५४, रा. काकडीआंबा, पोस्‍ट ताळंबा, ता. अक्‍कलकुवा, जि. नंदुरबार) यांनी दाखल केली. यात फिर्यादीच्‍या घराच्‍या अंगणात सार्वजनिक ठिकाणी असलेल्‍या बंद हातपंपाच्‍या दुरूस्‍तीवरून १४ जणांनी बेकायदेशीरपणे एकत्र येत वाद घालून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्‍याचे म्‍हटले आहे. तसेच संशयित आरोपींनी शिविगाळ करीत जीवे मारण्‍याची धमकी देतानाच बोलेरो जीपवर दगडफेक केल्‍याचेही फिर्यादीत नमूद करण्‍यात आले आहे.
या तक्रारीवरून सुरेश सोन्‍या तडवी, जीवन सोन्‍या तडवी, जयंती नरशी तडवी, अनिल जीवन तडवी, अजय मनेश तडवी, सावन राजेश तडवी, मस्‍तान मवाश्‍या तडवी, अशोक सखाराम तडवी, राजेश वनसिंग तडवी, संजय मनेश तडवी, संजित वनसिंग तडवी, वनस्‍ती सोन्‍या तडवी, लळिता जयंती तडवी, सकिना सुरेश तडवी (सर्व रा. काकडीआंबा पोस्‍ट ताळंबा) या १४ जणांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
यानंतर काही वेळातच सफिना सुरेश रजवी (रा. काकडीआंबा, पोस्‍ट ताळंबा) यांनी फिर्याद दाखल केली. बंद हातपंपाच्‍या दुरूस्‍तीवरून ९ जणांनी सरपंच केवल प्रकाश पाडवी यांच्‍या घराजवळ सार्वजनिक ठिकाणी ९ जणांनी बेकायदेशीरपणे एकत्र येत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करीत शिविगाळ व जीवे मारण्‍याची धमकी दिल्‍याचे या फिर्यादीत म्‍हटले आहे. यावरून सुरेश कोट्या पाडवी, योगेश दानजी पाडवी, शरद दानजी पाडवी, दानजी रुपल्‍या पाडवी, मच्‍छिंद्र जेमा पाडवी, सोन्‍या खार्‍या पाडवी, सुकराम वसंत पाडवी, अमृत कृष्‍णा पाडवी, ज्ञानेश्‍वर कृष्‍णा पाडवी (सर्व रा. काकडीआंबा पोस्‍ट ताळंबा) या ९ जणांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. या प्रकरणी अनुक्रमे पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल नरेंद्र सोनवणे व श्रेणी पोलिस उपनिरीक्षक गुमानसिंग पाडवी तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button