अनैतिक संबंधांच्या संशयावरून छळ असह्य झाला, विवाहितेने गळफास लावून घेतला; नंदुरबार तालुक्यातील घटना, पतीवर गुन्हा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पतीकडून होणारा शारीरिक व मानसिक त्रास असह्य झाल्याने एका विवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार तालुक्यातील वडवद पोस्ट भालेर येथे घडली. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून विनोद रोहिदास भिल याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकलाबाई विनोद भिल (रा. वदवद पोस्ट भालेर, ता. व जि. नंदुरबार) या २८ वर्षीय विवाहितेने २० मार्च रोजी भल्या सकाळी वडवद पोस्ट भालेर येथील राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. प्रारंभी मयत विवाहितेचे वडिल सायरसिंग जयसिंग ठाकरे (रा. वैजाली, ता. शहादा) यांच्या खबरीवरून त्याच दिवशी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र, दुसर्याच दिवशी सदर विवाहितेचा भाऊ मुकेश सायसिंग ठाकरे (२४, रा. वदवद पोस्ट भालेर, ता. व जि. नंदुरबार) याने पुन्हा पोलिस ठाण्यात येऊन महिलेचा पती विनोद भिल याच्याविरोधात चंद्रकलाबाई हिला आत्महत्येस प्रवृत्त तक्रार दाखल केली. विनोद हा पत्नी चंद्रकलाबाई हिला परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मारहाण तसेच शिविगाळ करायचा. मानसिक त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली, असा आरोप या फिर्यादीत करण्यात आला होता. त्यानुसार विनोद रोहिदास भिल याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्य कलम १०८, ११५ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील भामरे करीत आहेत.



