गल्लीत दुचाकी हळू चालव म्हटल्याचा राग आला अन् तिघे तीन जणांवर तुटून पडले; विसरवाडीनजीकच्या बर्डीपाडा खांडबारातील घटना

विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गल्लीत मोटारसायकल हळू चालवा असा सल्ला दिल्याच्या रागातून तिघांनी तरुणासह त्याची मावशी आणि चुलत भाचा यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना विसरवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बर्डीपाडा खांडबारा येथे शुक्रवारी (दि. २०) रात्री उशीरा घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मजर सलिम पठाण (३५, रा. राजीव गांधी नगर, बर्डीपाडा, खांडबारा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) असे फिर्यादीचे नाव आहे. व्यापारी असलेल्या मजर पठाण यांनी आरोपी मोईन शाहदत पठाण, समीर महेबुब पठाण, हैदर शहादत पठाण (तिन्ही रा. बर्डीपाडा, खांडबारा) यांना गल्लीत मोटायसायकल हळू चालवा, असा सल्ला दिला होता. याच रागातून या तिघांनी शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मजर यांच्यासह त्यांची मावशी रहेमतबी गुलाम कादिर तसेच चुलत भाचा नदीम लियाकत पठाण या तिघांवर शस्रांनिशी हल्ला चढवला.
यामध्ये मजर यांच्या डाव्या हातावर शस्राने वार करतानाच डोक्यात प्रहार करण्यात आले. रहेमतबी यांच्या तोंडावर, गालावर तर नदीम याच्या उजव्या हातावर रॉडने मारहाण करण्यात आली. यात हे तिघेही जखमी झाले, असे फिर्यादीत नोंद करण्यात आले आहे. यावरून मोईन, समीर व हैदर या तिघांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये विसरवाडी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास हेड कॉन्स्टेबल बिंद्या पाडवी करीत आहेत.



