दर्ग्यातील लिंबाच्या झाडातून निघाला धूर; चमत्कार समजून भाविकांनी केली गर्दी, पण सत्य समोर येताच अंधश्रद्धेचा बाजार उठला; नवापुरात नेमकं काय घडलं…

नवापुर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून घडलेल्या एका अनोख्या प्रकाराची जिल्हाभर चर्चा रंगली आहे. अंधश्रद्धा, अध्यात्मिक चमत्कार, वैज्ञानिक सत्य अशा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा रंगलेल्या या प्रकाराचे वास्तव समोर आल्यानंतर मात्र अंधश्रद्धेच्या चर्चेला विराम लागला.
त्याचे असे झाले की, नवापूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या आस्ताना हजरत सय्यद लाडन शहा सरकार बाबा दर्ग्याजवळील लिंबाच्या झाडातून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अगरबत्तीप्रमाणे धूर निघत होता. झाडाच्या शेंड्याकडून अचानक हा धूर निघत होता. ही बाब काही जणांच्या निदर्शनास येताच त्याची चर्चा सुरू झाली आणि काही मिनिटांतच ती गावभर पसरली. हा धूर म्हणजे दैवी संकेत किंवा चमत्कार मानून भाविकांनी या लिंबाच्या झाडाच्या दर्शनासाठी गर्दी सुरू केली. यामुळे परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले.
ही चर्चा उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने दर्ग्याकडे धाव घेत या प्रकाराकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले. संबंधित झाडाच्या बुंध्याजवळ बाबाचा दर्गा असून त्या ठिकाणी नियमितपणे दिवाबत्ती व अगरबत्ती लावण्याची प्रथा आहे. याच दिव्याच्या आगीमुळे झाडाच्या आतील भागात हळूहळू आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला. मात्र, ही आग बाहेरून न दिसता झाडाच्या आतील भागात साचत राहिली आणि काही दिवसांनंतर झाडाच्या शेंड्याकडून धूर बाहेर येऊ लागला, असाही अंदाज लावला गेला.
उपनगराध्यक्ष नगराळे यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तीन ते पाच अग्निशमन बंबाचे पाणी टँकरच्या सहाय्याने झाडावर पाणी टाकण्यात आले. मात्र, झाडाच्या आतील भागात आग असल्याने ती विझवणे अत्यंत कठीण जात होते. अखेर नगर परिषदेने परवानगी घेऊन झाडाची छाटणी करण्याचा निर्णय घेतला. झाड छाटताना देखील आतून धूर निघत होता. त्यामुळे झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचवून आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवण्यात आले. नवापूर नगरपरिषद वृक्ष प्राधिकरण अधिकारी विशाल पाटील, अग्निशमन अधिकारी राजेश गावित, सलीम पठाण, मयूर साळवे, पिंटू भालेराव आदी अधिकारी व कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न आग विझवली. यानंतर झाड छाटल्यांतर धूर येणे पूर्णपणे थांबले आणि सोबतच अंधश्रद्धेच्या अनुषंगाने सुरू असलेली चर्चाही थांबली.



