नंदुरबार जिल्हा

शहाद्यातील अतिक्रमण हटावसाठी आता संदीप पाटीलही मैदानात; म्‍हणाले, ठराविक नको, सगळीच अतिक्रमणे काढून शहराचा श्‍वास मोकळा करा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा नगर परिषद हद्दीतील अतिक्रमणांच्‍या मुद्याचा धुरळा खाली बसायला तयार नसून, आता माजी नगरसेवक संदीप पाटील यांनीही या विषयात उडी घेतली आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार असालच तर ही मोहीम केवळ काही अतिक्रमणे हटवण्‍यापुरती राहू नये. हटवायची तर सगळीच अतिक्रमणे हटवून शहराचा श्‍वास मोकळा करा, अशी मागणीच पाटील यांनी केली आहे.
माजी नगरसेवक संदीप पाटील यांनी शहरातील संभाव्‍य अतिक्रमण मोहिमेच्‍या अनुषंगाने नगर परिषद मुख्‍याधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमण काढण्याबाबत काही लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू असणे, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, ही मोहीम फक्त ठराविक व्यक्ती किंवा व्यावसायिकांपुरती मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त होत असणे नक्‍कीच योग्‍य नाही, असे त्‍यांनी निवेदनात म्‍हटले आहे.
शहरातील मुख्य रस्ते, खुल्या जागा तसेच विविध महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून, त्यामध्ये काही धनदांडग्यांचाही समावेश आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविताना भेदभाव न करता सर्वांवर समान कारवाई करावी. तसेच, बदनामी किंवा वैयक्तिक वैरातून निवडक अतिक्रमणांवरच कारवाई करण्यात आली, तर त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनात नमूद करण्‍यात आले आहे.
दरम्यान, नगर परिषदेने भविष्यात पारदर्शक, न्याय्य व सर्वसमावेशक पद्धतीने अतिक्रमण  हटाव मोहीम न राबविल्‍यास शहरवासीयांमध्ये तीव्र रोष निर्माण होऊन आंदोलन छेडले जाऊ शकते, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button