नंदुरबार जिल्हा

नवापूरच्‍या कोंडाईबारी घाटात पुन्‍हा भीषण अपघात; ट्रकची तीन वाहनांना धडक, एक ठार, तिघे गंभीर जखमी 

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्‍यातील कोंडाईबारी घाटातील अपघातांची मालिका थांबण्‍याचे नाव घेत नसल्‍याचे सोमवारी सकाळी पुन्‍हा सिद्ध झाले. धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गावरील या घाटात सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मका भरून भरधाव वेगात धावणारा ट्रक (क्र. एमएच १८ बीजी ६८६९) रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रेलरवर आदळला. या ट्रकचा वेग इतका होता की ट्रेलरला धडक दिल्‍यानंतर तसाच वेगात पुढे जाऊन त्‍याने पुढील दुसऱ्या ट्रेलरसह एका आयशर वाहनालाही जोरदार धडक दिली. या साखळी अपघातात एकूण दोन ट्रेलर, एक ट्रक आणि एक आयशर वाहनाचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात दिनेश दीपचंद लोहार (३६, रा. छोटा राजस्थान) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विष्णू छोटू माळी (३५, रा. पिंपळनेर, धुळे), मयूर अनिल पवार (२६, रा. सामोडे) आणि जावेद अहमद शेख (२६, रा. नवापूर) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकाने तत्काळ पाठलाग करून मोरकरंजा परिसरात त्याला ताब्यात घेतले.  
घटनेची माहिती मिळताच घटनास्‍थळी दाखल झालेल्‍या रुग्णवाहिकांतून जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विसरवाडी पोलिस व महामार्ग मदत केंद्राच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button