चार पोरांचा बाप प्रेयसीला घेऊन पुण्याला गेला, सात महिन्यांनी गावी परतताच सासरच्यांनी हल्ला चढवला; नंदुरबारच्या रनाळातील प्रकार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विवाहित आणि चार मुलांचा पिता असूनही गावातीलच प्रेयसीला घेऊन परागंदा झाल्यानंतर तब्बल ७ महिन्यांनी गावी परतलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी चोप दिल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावात घडली. या प्रकरणी सदर जावयाच्या तक्रारीवरून चुलत सासर्यासह एकूण चौघांविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चुनीलाल वसंत भिल (४०, रा. इंदिरानगर, सप्तश्रृंगी मंदिराजवळ, रनाळा, ता. नंदुरबार) याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्याला तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्ये आहेत. असे असूनही त्याचे गावातीलच एका महिलेसोबत सूत (प्रेमसंबंध) जुळले होते. यातूनच तो त्या महिलेला घेऊन मजुरी कामासाठी पुण्याला निघून गेला होता.
यानंतर तो नुकताच त्या महिलेसह गावी परतला होता. याच दरम्यान त्याच्या घराशेजारीच त्याची सासुरवाडी आहे.
चुनीलाल गावी परतल्याची माहिती मिळताच त्याचे चुलत सासरे आणि तीन महिन्यांनी ७ महिन्यांनी गावी का परतला, याचा जाब विचारीत त्याला मारहाण सुरू केली. यावेळी त्याच्यावर लाथाबुक्क्यांसह काठीने तोंडावर, पाठीवर व डाव्या हातावर वार करण्यात आले, असे चुनीलाल भिल याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून सतीश उखा भिल, नितीन सतीश भिल, पावबा सुका भिल, राकेश राजू भिल (सर्व रा. रनाळा) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोज विसपुते हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



