नंदुरबारच्या महिला हुशार, चार दिवसांत केला ५० लाखांचा व्यापार; तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ या नेहमीच्या चक्रातून बाहेर पडत नंदुरबारच्या महिलांनी उद्योग, व्यापारातही आपण अग्रेसर असल्याचे तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शनाच्या माध्यमातून सार्या जगाला दाखवून दिले. महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. २० ते २३ मार्चदरम्यान नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या या प्रदर्शनाने केवळ विक्रीचा नवा विक्रमच प्रस्थापित केला नाही, तर महिला सक्षमीकरणाच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.
या चार दिवसीय प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांनी सहभाग नोंदवत एकूण ३५ स्टॉल उभारले होते. यात कृषीपूरक उत्पादने, घरगुती पदार्थ, हस्तकला, सेंद्रिय उत्पादने, तसेच पारंपरिक खाद्यपदार्थांचा समावेश होता. गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेल्या या वस्तूंना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. परिणामी, अवघ्या चार दिवसांत सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल झाल्याने आयोजक आणि सहभागी महिला गटांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यांनी महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मोठी मदत होत असल्याचे नमूद केले. त्यांनी सर्व स्टॉलला भेट देत विविध उत्पादनांची पाहणी केली व महिलांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले.
प्रदर्शनाच्या काळात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून खरेदीला प्राधान्य दिले. स्थानिक उत्पादनांना मिळालेल्या या प्रतिसादामुळे ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेलाही बळ मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



