नंदुरबार जिल्हा

शहादा झाले भगवामय : श्रीराम नवमीची जय्‍यत तयारी, गुरुवारी जंगी शोभायात्रा, सांस्‍कृतिक- धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : येत्‍या गुरुवारी साजर्‍या होणार्‍या श्रीराम नवमीचा उत्‍सव साजरा करण्‍यासाठी शहादानगरी सज्‍ज झाली आहे. श्रीराम नवमीची जय्‍यत तयारी शहरात सुरू असून, या उत्‍सवाच्‍या निमित्ताने शहादा शहर आतापासूनच भगवामय झाले आहे.
मिळालेल्‍या माहितीनुसार, शहादा शहरात दरवर्षी श्रीराम नवमीनिमित्त भव्‍य शोभायात्रेचे आयोजन करण्‍यात येते. शहादा शहरासह परिसर आणि जिल्‍हाभरातील सुमारे सात ते आठ हजार श्रीराम भक्‍त या शोभायात्रेत सहभागी होतात. ही परंपरा कायम राखत बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेने यंदाही भव्‍य शोभायात्रा काढण्‍याचे नियोजन केले आहे.
त्‍या अनुषंगाने बजरंग दलाचे अध्‍यक्ष आणि गोरक्षा समितीचे जिल्‍हाध्‍यक्ष राजा साळी यांच्‍या मार्गदर्शनाखाली बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेतील त्‍यांचे सहकारी जय्‍यत तयारी करीत आहेत.
असे असतील कार्यक्रम
येत्‍या गुरुवारी (दि. २६) श्रीराम नवमीच्‍या दिवशी शहरातील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा निघेल. दुपारी १२ वाजता शहीद लाल चौकातील पुरातन श्रीराम मंदिरात धार्मिक विधीवत पूजा व महाआरती होईल. त्‍यानंतर दुपारी चार वाजता शोभायात्रेला प्रारंभ होईल. ही शोभायात्रा पटेल चौक, गुजर गल्‍ली, क्रांती चौक, बागवान गल्‍ली, जनता चौक, नगरपालिका, मेन रोड, नेहरू चौक, तूप बाजार, मार्गे शहीद लाल चौकात पोहोचून तेथे समारोप होईल.
शोभायात्रेत एका ट्रॉलीवर श्रीरामाची भव्‍य प्रतिकृती आणि जिवंत देखावा असेल. याच ठिकाणी १७ फुट हनुमानाची मूर्तीही या ट्रॉलीवर असेल. यंदा रावेर जि. जळगाव येथील महिलांचे पथक शोभायात्रेत सहभागी होणार आहे. या उत्‍सवानिमित्त शहरात चौकाचौकात तसेच मुख्‍य रस्‍त्‍यांवर भगव्‍या पताकांची झालर टाकण्‍यात आली असून, भगवान श्रीरामाचे मोठे कटआऊटस्‌, कमानी, बॅनर्स लावण्‍यात आले आहेत. त्‍यामुळे शहर भगवामय झाले असून, उत्‍सुकता वाढवलेल्‍या या उत्‍सवात सहभागी होण्‍याचे आवाहन राजा साळी व त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button