अफवांचा बाजार : शहाद्यातील पेट्रोल पंपावर अचानक वाहनचालकांची गर्दी; इंधनासाठी लांबच लांब रांगा, उडाला गोंधळ

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील स्वस्तिक पेट्रोल पंपावर सोमवारी संध्याकाळी इंधन भरण्यासाठी वाहनचालकांनी अचानक मोठी गर्दी केली. शहरातील इतर तीन पेट्रोल पंप बंद असल्यामुळे अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही काळ पंप परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, इंधन दरवाढीची शक्यता तसेच पुढील काळात इंधन उपलब्ध होणार नाही, अशा अफवांमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पंपाकडे धाव घेतली. दुचाकी, चारचाकी वाहनांसह ड्रम घेऊन आलेल्या नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य दिसून आले.
या अनपेक्षित गर्दीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही झाला असून परिसरात काही ठिकाणी किरकोळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पेट्रोल पंपावर गोंधळ वाढू लागल्याने आणि वाहनधारकांची गर्दी वाढतच चालल्याने अखेर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंप प्रशासनाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करत इंधन वितरण सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संबंधित प्रशासनाकडून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, तसेच अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन पेट्रोलपंप चालकांसह प्रशासनकाकडून करण्यात आले आहे.



