नंदुरबार जिल्हा

इंधन संपण्‍यासह भाववाढीची अफवा जोरात : शहाद्यातील पेट्रोल पंपावरील गर्दी ओसरेना, लांबच लांब रांगा लावून अनेकांनी रात्र जागून काढली

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आखातातील युद्ध सुरूच राहिल्‍यास इंधनाची कमतरता भासू शकते आणि दरही गगनाला भिडू शकतात, अशा अफवांनी वेग पकडल्‍याने शहादा आणि परिसरात पेट्रोल खरेदीसाठी पंपांवर ग्राहकांच्‍या रांगा लागल्‍या आहेत. विशेष म्‍हणजे ही गर्दी मंगळवारी सकाळीही कायम राहिल्‍याने गोंधळाची स्‍थिती असल्‍याचे चित्र आहे. दरम्‍यान, पेट्रोल पंप चालकांनी मात्र इंधनाचा पुरेसा साठा उपलब्‍ध असल्‍याचे स्‍पष्‍टीकरण देत लोकांना अफवांवर विश्‍वास न ठेवण्‍याचे आवाहन केले आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस सुटी आल्‍याने बँकिंग व्‍यवहार थांबले होते. परिणामी शहादा शहर व परिसरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल – डिझेलचा साठा पोहोचू शकला नव्‍हता. साठा उपलब्‍ध नसल्‍याने सोमवारी शहाद्यातील तीन पेट्रोल पंप बंद होते. मात्र, याच काळात आता इंधन मिळणार नाही आणि भविष्‍यात इंधनाच्‍या दरात मोठी वाढ होणार असल्‍याची अफवा पसरली. यामुळे शहादा शहरातील स्वस्तिक पेट्रोल पंपावर सोमवारी संध्‍याकाळी इंधन भरण्यासाठी वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती. या पेट्रोल पंपावर दुचाकी, चारचाकी वाहनांसह ड्रम घेऊन आलेल्‍यांच्‍या लांबच लांब रांगा लागल्‍या  होत्‍या. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही काळ पंप परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळीही तीच परिस्‍थिती
सोमवारी संध्‍याकाळी पेट्रोल पंपांवर लागलेल्‍या वाहनधारकांच्‍या गर्दीचे चित्र मंगळवारी सकाळीही कायम होते. सोमवारी संध्‍याकाळी लागलेली रांग मोठी असल्‍याने अनेकांना उशीरापर्यंत पेट्रोल मिळण्‍यासाठी वाट पाहावी लागली. पेट्रोल पंपावर गोंधळ वाढू लागल्‍याने आणि वाहनधारकांची गर्दी वाढतच चालल्‍याने अखेर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंप प्रशासनाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करत इंधन वितरण सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अफवांचा धुरळा खाली बसत नसल्‍याने वाहनधारकांची गर्दी कमी व्‍हायला तयार नसल्‍याचे दिसून आले. या अनपेक्षित गर्दीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही झाला असून, पेट्रोल पंप परिसरात काही ठिकाणी किरकोळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
अफवांवर विश्‍वास न ठेवण्‍याचे आवाहन
इंधन संपण्‍यासह दरवाढीची अफवा कुठून सुरू झाली हे सांगणे कठीण असले तरी प्रत्‍यक्षात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्‍ध असल्‍याचे पेट्रोल पंप चालकांनी स्‍पष्‍ट केले आहे. पेट्रोल पंपचालकांसह प्रशासनानेही जनतेला कोणत्‍याही अफवांवर विश्‍वास न ठेवता संयम राखावा आणि अनावश्‍यक गर्दी टाळावी, असे आवाहन केले आहे.

पेट्रोल-डिझेलचा साठा संपणार, भविष्‍यात मिळणारच नाही, मोठी भाववाढ होणार, या निव्‍वळ अफवा आहेत. प्रत्‍यक्षात तशी परिस्‍थिती नाही. इंधनाचा पुरेसा साठा उपलब्‍ध आहे. लोकांनी गरज असेल तेवढ्याच इंधनाची खरेदी करावी. अनावश्‍यक साठा करू नये. अफवांवर विश्‍वास ठेवून इंधन खरेदीसाठी गर्दी करू नये.
– दीपक पटेल (आर.सी. पटेल पेट्रोलपंप, शहादा)

———————————————————————-

पेट्रोल-डिझेल संपण्‍याच्‍या भीतीने लोक अचानक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. मात्र, शहादा शहरातील १२ आणि तालुक्‍यातील एकूण ३० पेट्रोलपंपांवर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्‍ध आहे. तांत्रिक अडचणीमुळे सोमवारी काही पेट्रोल पंप बंद होते. त्‍यामुळे आमच्‍याकडे गर्दी वाढली होती. पण आता परिस्‍थिती नियंत्रणात आहे. लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवून खरेदीसाठी अनावश्‍यक गर्दी टाळावी, असे आमचे आवाहन आहे.
– डॉ. राकेश जैन (स्‍वस्‍तिक पेट्रोलपंप, शहादा)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button