गुन्हे वार्ता

धडगावात बनावट देशी दारू निर्मितीचा पर्दाफाश; एलसीबीसह स्‍थानिक पोलिसांनी केला कारखाना उद्‍ध्‍वस्‍त; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : धडगावमध्‍ये अपायकारक स्‍पिरीटच्‍या साह्याने बनावट देशी दारूची निर्मिती करणार्‍या अवैध कारखान्‍यावर धाड टाकून हा कारखाना उद्‍ध्‍वस्‍त करण्‍यात आला आहे. नंदुरबार पेलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखा (एलसीबी) आणि धडगाव पोलिसांच्‍या संयुक्‍त पथकाने ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तब्‍बल एक लाख ५२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला असून, हा अवैध उद्योग करणार्‍या एका जणाविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनाजे गावातील कारमारीपाडा येथे एका झोपडीच्या आडोशाला सुनिल हात्या पाडवी हा व्‍यक्‍ती मानवी आरोग्यास अपायकारक स्पिरीटपासून बनावट देशी दारू तयार करून विक्रीसाठी साठवणूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकासह धडगाव पोलीस ठाण्याच्या मदतीने छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
छाप्यामध्ये बनावट दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे स्पिरीट, टँगो पंच तयार करण्याचे साहित्य, रंगीत बॉक्स, पांढऱ्या गोण्या व इतर साहित्य असा एकूण एक लाख ५२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अन्‍वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पो.उपनिरीक्षक मकेश पवार, विकास गुंजाळ, वाघ, ओगले आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button