शहाद्यात मुले पळविणार्या महिलांच्या टोळीचा धुगडूस; दोन चिमुकल्यांच्या अपहरणाचा प्रयत्न, मुलांनी हिंमत दाखवल्याने अनर्थ टळला

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरात लहान मुलांना पळविणारा महिलांची टोळी कार्यरत झाली असून, या टोळीतील दोन संशयित महिलांनी चाकूचा धाक दाखवून दोन मुलांना पळविण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शहादा शहर आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या महिलांचा शोध सुरू केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील डोंगरगाव रोड परिसरात सोमवारी संध्याकाळी ७.३० ते ८.०० वाजेच्या सुमारास दोन संशयित महिलांनी दोन लहान मुलांना पळवण्याचा प्रयत्न केला. या महिलांनी परिसरात खेळत असलेल्या डॉ. तुषार सनंसे यांचा मुलगा श्रेयस आणि सतनामसिंग यांचा मुलगा दर्शन या दोघांना टार्गेट केले. त्यांनी मुलांना चाकू दाखवून धमकावत पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही मुलांनी या बिकट प्रसंगीही घाबरून न जाता प्रसंगावधान राखत धैर्याने त्या महिलांचा प्रतिकार केला आणि चाकूचा धोका चुकवत तेथून सुटका करून घेत पळ काढला.
घटनेनंतर त्या दोन्ही महिला घटनास्थळावरून वेगाने पसार झाल्या. विशेष म्हणजे, मागील ४ ते ५ दिवसांपासून परिसरात अशा संशयास्पद हालचाली सुरू होत्या, अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. ही घटना कळल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषत: लहान मुले असणार्या कुटुंबियांकडून काळजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व निवृत्त उपप्राचार्य दिनानाथ पाटील (डी.सी. पाटील) यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.
दहा दिवसांपूर्वीच पकडली गेली एक महिला
दहा दिवसांपूर्वी पिंपळोद ता. निझर जि. तापी (गुजरात) येथे एका महिलेला मुले पकडताना ग्रामस्थानी पकडले होते. तिला निझर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरही गेल्या दहा दिवसांत शहादा शहरात काल तिसर्यांदा लहान मुले पळविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. एक महिला पकडली गेली असतानाही अशी घटना घडत असेल तर मुले पकडणाऱ्यांची मोठी टोळी कार्यरत असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागरिकांना आवाहन
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये, अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळण्याचे समज द्यावेत, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



