शहादा नगराध्यक्ष अभिजित पाटील यांचे कौतुकास्पद दातृत्त्व; ४० टीबी रुग्ण घेतले दत्तक, ५ रुग्णांना पोषण आहाराचे वाटप!

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून शहादाचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी शहरातील ४० क्षय (टीबी) रुग्णांना सहा महिन्यांसाठी दत्तक घेण्याची घोषणा करून दातृत्त्वाचे दर्शन घडवले. एवढेच नव्हे तर त्यांच्या दालनात पाच टीबी रुग्णांना त्यांच्या हस्ते निक्षय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
शहादा तालुका वैद्यकीय यंत्रणेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या दालनात पार पडलेल्या कार्यक्रमात शहरातील पाच टीबी रुग्णांना निक्षय पोषण आहार (फूड बास्केट) चे वाटप करण्यात आले. यात गहू, तांदूळ, तेल, गूळ शेंगदाणे इ. पौष्टिक सामग्री देण्यात आली. यावेळी शहादा शहरातील तब्बल ४० रुग्ण सहा महिन्यांसाठी दत्तक घेत असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. या बद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण व तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वळवी यांनी पाटील यांचे आभार मानले.
यावेळी शहादा क्षयरोग पथकाच्या सिनिअर टीबी लॅब सुपरवायझर मेघा खारकर यांनी टीबी बद्दल माहिती देऊन रुग्णांना जनजागृती केली. आशा भारती चौधरी, सुभद्रा कोळी आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी्तेसाठी मेघा खारकर, तुषार गोसावी, उमेश पाटील यांनी परिश्रम घेतले.



