दहशत माजवण्याचा डाव उधळला; विनापरवाना तलवार बाळगणार्या तरुणाला ठोकल्या बेड्या, नंदुरबार तालुका पोलिसांची बेधडक कारवाई

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सणासुदीच्या दिवसांत शस्रांच्या आधारे दहशत माजवण्याचा डाव नंदुरबार पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांच्या पथकाने विनापरवाना तलवार बाळगणार्या २२ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात यश मिळविले असून, त्याच्याकडून सुमारे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे अवैध दारू वाहतुकीवरील कारवाईनंतर अवघ्या २४ तासांतच नंदुरबार तालुका पोलिसांनी ही दुसरी मोठी कारवाई केली आहे.
सध्या सण-उत्सवाचे दिवस सुरू असून, या काळात जिल्ह्यात गस्त वाढवण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास खामगाव परिसरातील नदी पुलाजवळ पोलिस पथक गस्त घालत होते. यावेळी एका मोटारसायकलस्वाराची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे लाल कापडी म्यानमध्ये लपवून ठेवलेली सुमारे ७२ सेंटीमीटर लांबीची धारदार स्टीलची तलवार आढळून आली. लखन वासू वळवी (२२, रा. विरचक, ता. नंदुरबार) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडे हे शस्र बाळगण्याचा परवानाही नव्हता.
पोलिसांनी लखन वळवी याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तलवार आणि हिरो स्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. एमएच ३९ एके १३८३) असा एकूण ५० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार विनायक सोनवणे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार रमेश बडये करीत आहेत.



